हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑफलाईन परीक्षेच्या निषेधार्थ 31 जानेवारी रोजी धारावी येथे विद्यार्थ्यांनी रस्त्यावर मोठे आंदोलन केले. विद्यार्थ्यांच्या या गोंधळामुळे येथे काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी हिंदुस्थानी भाऊ ऊर्फ विकास पाठकविरोधात धारावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटकही केली आहे. याबाबात शिवसेना खासदार संजय राऊत यां प्रतिक्रिया दिली आहे. विध्यार्थांनी जे आंदोलन केले ते राजकीय पाठबळ असल्याशिवाय शक्य नाही. यामागे नक्कीच राजकीय हात आहे, असे राऊत यांनी म्हंटले आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, काल जे विद्यार्थ्यांचे आंदोलन झाले त्यामागे नक्कीच कोणाचा तरी हात आहे. राजकीय पाठबळ असल्याशिवाय विद्यार्थ्यांचे आंदोलन शक्य नाही. काही राजकीय लोक समाजमाध्यमांच्या साहाय्याने मुलांना बिघडवण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे राऊत यांनी सांगितले.
राज्य सरकारच्या ऑफलाईन परीक्षेच्या निर्णयावरून 31 जानेवारी रोजी हजारो विद्यार्थ्यांनी चांगलाच आक्रमक पावित्रा घेतला होता. त्यांनी धारावीमध्ये रस्त्यावर उतरत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराला घेरावही घातला. प्रसिद्ध सोशल मीडिया स्टार हिंदुस्तानी भाऊ याच्या आवाहनानंतरच विद्यार्थ्यांनी धारावीमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली, असा आरोप करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी हिंदुस्तानी भाऊवर कायदेशीर कारवाई करीत त्याला अटकही केली.