हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारने दिशा सालियन प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. “या शिंदे-फडणवीस सरकारला एसआयटी स्थापन करण्याची एवढी खाज आहे. एसआयटी मार्फत चौकशीच करायची असेल तर अगोदर खोकेवाल्या 40 आमदारांचीही चौकशी करा, असे आव्हान राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिले.
संजय राऊत यांनी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्य सरकारने एसआयटीचं रेशनिंग केले आहे. वास्तविक या सरकारकडून मागेल त्याला एसआयटी देण्यात येत आहे. आम्हीही एसआयटीची मागणी करत आहोत. महाराष्ट्रात एसआयटी स्थापन व्हायला पाहिजे, अशी आमचीही इच्छा आहे. जे 40 आमदार ज्या पद्धतीने 50 खोके देऊन फोडण्यात आले. तो काय व्यवहार होता याची सर्वात अगोदर एसआयटी चौकशी सरकारने करावी.
पण जे विषय संपले आहेत. जे विषय पोलीस आणि सीबीआयने संपवले आहेत, त्यावर एसआयटी स्थापन करून सत्तेचा आणि पोलीस यंत्रणेचा गैरवापर सुरू आहे. आम्ही सर्व तपासाला सामोरे जाऊ,. तुम्ही तोंडावर पडाल हे याद राखा. बदनामीचं शस्त्र बाहेर काढलं जात आहे. पण आम्ही त्यातून बाहेर पडू. हे अग्निदिव्य आहे. अशा अनेक अग्निदिव्यातून शिवसेना तावून सलाखून बाहेर पडलेली आहे.
एसआयटी ही खूप महत्त्वाच्या अन्यनसाधारण प्रकरणात स्थापन केली जाते. पण सरकारने एसआयटी आणि पोलिसांचे महत्त्वं कमी केले आहे, ऊठसूठ एसआयटी स्थापन करायची, पोलिसांना काही कामच ठेवलेले नाही. सरकारपक्षातील अनेकांची प्रकरणे बाहेर पडली. त्याचाही तपास होईल. आम्ही दोन दिवस नागपूरला जात असल्याचे राऊत यांनी सांगितले.