हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यात सध्या एका प्रकरणाची चांगलीच चर्चा होत आहे. ते प्रकरण म्हणजे सातारा जिल्ह्यातील फलटण येथील धनंजय ननावरे यांनी ऑनकॅमेरा आपले बोट छाटून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना व्हिडीओ पाठवल्याची. या घटनेवरून बऱ्याच घडामोडी मुंबईत घडल्या. एका व्हिडीओमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारमधील दोन मंत्री आरोपी असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
खा. संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, बोट छाटलेल्या प्रकरणात शिंदे सरकारमधील दोघे मंत्री सहभागी आहेत. एक मुंबईतला आणि एक साताऱ्यामधला आहे. हे विदारक चित्र आहे, तरीही गृहमंत्र्यांना वेदना कळत नसतील तर अवघड आहे. मुख्य आरोपी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आहेत. या प्रकरणातलं पूर्ण सत्य समोर आले पाहिजे. माणुसकी असती तर त्या भावाला समोर बसवून गृहमंत्र्यांनी चर्चा केली असती. अमानुष पद्धतीने राज्यकर्ते वागत आहेत.
नेमकं प्रकरण काय?
धनंजय ननावरे यांचे बंधू नंदकुमार ननावरे यांनी 1 ऑगस्ट रोजी आपल्या पत्नीस इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. त्यांच्या खिशात काही लोकांचे नावे असलेली चिठ्ठी सापडली होती. पण या प्रकरणात पोलिसांकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप करत धनंजय ननावरे यांनी कॅमेरा सुरू करून आपल्या हाताचे बोट छाटले. या घटनेनंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. दरम्यान, याप्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. व्हिडीओमध्ये धनंजय ननावरे जी नावे घेत आहेत, ती नावे आणि त्यांच्या भावाने उल्हासनगरमध्ये पत्नीसह आत्महत्या केल्यावेळी चिठ्ठीत लिहून ठेवलेली नावे यात तफावत असल्याने पोलिस त्याचा तपास करीत आल्याचे सांगण्यात येत होते. या प्रकरणी रोज नवीन माहिती समोर येत आहे. या प्रकरणावरूनच संजय राऊत यांनी गौप्यस्फोट केला आहे.