हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी करत भाजपशी युती केली. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. यानंतर बंडखोरी करणाऱ्या 16 आमदारांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने विधानसभा उपाध्यक्षांकडे करण्यात आली आहे. दरम्यान, 16 आमदारांच्या अपात्रतेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडत असून तत्पूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. “सुप्रीम कोर्टावर आमचा विश्वास आहे. या देशाची न्यायव्यवस्था कायदा आणि घटना त्यावर विश्वास ठेऊनच आम्ही आजपर्यंत काम करत राहिलो आहोत. सर्वोच्च न्यायालय हे कुणाच्याही खिशात असू शकत नाही,” अशी टीका राऊतांनी शिंदे गटावर केली आहे.
संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “ज्याप्रकारे महाराष्ट्रात शिंदे गट-भाजप असे बेकायदेशीर सरकार प्रस्थापित करण्याचा प्रयत्न झालेला आहे. यासाठी राजभवनाचा वापर करण्यात आला आहे. विधीमंडळाचा वापर करण्यात आला. या अन्यायाविरोधात शिवसेना महाराष्ट्राच्या 11 कोटी जनतेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात पोहोचलेली आहे. आमचा न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे. या देशाची न्यायव्यवस्था कोणाची गुलाम असू शकत नाही. अशी आमची भावना आहे. त्यामुळे आम्ही मोठ्या अपेक्षेने सर्वोच्च न्यायालयाकडे पाहतो,” असे राऊत यांनी म्हंटले आहे.
या देशात लोकशाही आहे की नाही. या देशातील राज्याच्या कारभार राज्यघटनेनुसार चालतोय का नाही, की तिथेही दडपशाही आहे. हे आजच्या सुनावणीनंतर सर्वांना कळेल. संपूर्ण देश सर्वोच्च न्यायालयाकडे एका आशेने पाहत आहे. त्यामुळे याबाबतीत निर्णय सर्वोच्च न्यायालय घेईल. सर्वोच्च न्यायालय आमच्या खिशात आहे. निकाल आमच्या बाजूनेच लागेल, असे म्हंटले जात आहेत. त्यामुळे लोकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे, असेही राऊतांनी म्हंटले.