हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| हिवाळी अधिवेशनामध्ये नवाब मलिक यांनी सहभाग नोंदवल्यापासून आणि त्यांना महा आघाडीमध्ये घेण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नकार दिल्यापासून राजकीय वर्तुळात एक वेगळा वाद निर्माण झाला आहे. या मुद्द्यावरूनच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. तसेच, “तुमच्या सभागृहात आणि संसदेत असे लोक तुम्ही पक्षात घेतलेत ज्यांच्यावर नवाब मलिकांपेक्षा भयंकर गुन्ह्यांची नोंद आहे.” अशी टीका देखील भाजपावर केली आहे.
जुन्या गोष्टींची आठवण करून देत संजय राऊत म्हणाले की, “आर्थिक फसवणूक ही एकप्रकारे आर्थिक दहशतवाद आहे.हे पंतप्रधान नेहमी सांगतात.आमच्या पक्षाचे खासदार, राष्ट्रवादीचे खासदार तुम्ही सोबत घेतले त्यांच्यावर आरोप आहेत. तुम्हाला त्यांच्यापासून काही त्रास नाही. प्रफुल पटेल जे राष्ट्रवादीचे खासदार आहेत. जेव्हा ते केंद्रात मंत्री होते तेव्हा भाजपानेच आरोप केले होते”
त्याचबरोबर, “पटेल यांचे दाऊद आणि इक्बाल मिर्ची यांच्यासोबत आर्थिक व्यवहार आहेत असं म्हटलं होते. आज प्रफुल पटेल कोणासोबत आहेत? नवाब मलिकांना तुम्ही टार्गेट करताय मग प्रफुल पटेल चालतात? तुम्ही कायद्याची, नैतिकतेची भाषा करता, देशभक्तीबाबत बोलता मग देशभक्तीची व्याख्या नवाब मलिकांना वेगळी आणि प्रफुल पटेल यांना वेगळी आहे का? भावना गवळी, हसन मुश्रीफ, प्रताप सरनाईक यांच्यासाठी वेगळी आहे का?” असा सवाल देखील संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
पुढे बोलताना, “देवेंद्र फडणवीसांनी पत्र लिहून ड्रामा केला तो प्रफुल पटेल यांना पत्र लिहून का केला नाही? दोघांचे गुन्हे सारखे, दोघांवर ईडीने कारवाई केली. दोघांचे दाऊदशी संबंध दाखवले आहेत. दोघांनी दाऊदच्या हस्तकांसोबत व्यवहार केले आहेत. मग प्रफुल पटेल हे पंतप्रधान मोदी-गृहमंत्री शाह यांच्या मांडीला मांडी लावून बसतात.पण नवाब मलिकांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही असं फडणवीस म्हणतात.बेईमान, गद्दार लोकांनी ईडीला घाबरून पलायन केले कारण तुमच्यावर गंभीर आरोप आहेत” अशा शब्दात राऊतांनी भाजपावर प्रहार केला आहे.