हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तब्बल 102 दिवसानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची तुरुंगातून सुटका झाली. न्यायालयातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी शिंदे गटावर निशाणा साधण्यास पुन्हा सुरुवात केली आहे. आज राऊतांनी पुन्हा एक भाकीत करणारे विधान केल्याने खळबळ उडाली आहे. “महाराष्ट्राचं राजकारण इतकं अस्थिर झाले आहे की उद्धव ठाकरे सांगतायत ते खरे आहे. मध्यावधी निवडणुकांची तयारी दिल्लीत सुरू झाली आहे. जे म्हणतात अमुक-तमुक आमच्यासोबत आहेत, त्यांच्यातच फूट पडण्याची तयारी सुरू झाली आहे. फुटिरांच्या प्रत्येक गटात एक शिंदे कायम असतो लवकरच शिंदे गटात फूट पडणार आहे, असे भाकीत राऊतांनी केले.
शिंदे गटात दाखल झालेलया खासदार गजानन किर्तीकर यांचे पुत्र अमोल किर्तीकर यांनी राऊतांची भेट घेतली. यावेळी राऊतांनी माध्यमाशी संवाद साधला. ते म्हणाले की, राज्यात लवकरच मध्यावधी निवडणुका लागणार आहेत. या निवडणुकांची तयारी दिल्लीत सुरु झाली आहे.
अमोल किर्तीकर कडवट शिवसैनिक आहेत. ते शिवसेनेसोबतच आहेत. गजानन किर्तीकरांनी घेतलेल्या निर्णयात ते सहभागी नाहीत. त्याचा आम्हाला सगळ्यांना आनंद आहे. १०० दिवसांनी तुरुंगातून सुटल्यानंतर जेवढा आनंद झाला नाही, तेवढा आनंद मला अमोल आमच्यासोबत राहिल्याचा झालाय. अशाच कडवट लोकांसोबत शिवसेनेचा प्रवास पुढे जाणार आहे. आम्हाला अनेक लोक सोडून गेले. पण गजानन किर्तीकर सोडून गेल्याचं दु:ख आम्हाला जास्त असल्याचे राऊतांनी म्हंटले.