हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान आहेत. पण सध्या उद्धव ठाकरेंचा मानेचा त्रास आणि त्यामुळे त्यांना सक्तीची दोन महिने विश्रांती यामुळे अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यानुसार राज्याचा मुख्यमंत्री बदलणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. आता या चर्चांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्टपणे उत्तर देत पूर्णविराम दिला आहे.
अशा पुड्या कोण सोडतो मला माहिती नाही. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले तेव्हाच्या प्रक्रियेमधील मी एक साक्षीदार आहे. तसेच एक क्रियाशील कार्यकर्ताही होतो. कुणाच्या डोक्यात कल्पना नव्हती. तेव्हा निकाल सुरू असताना मी शरद पवारांकडे जाऊन असं होऊ शकतो असं सांगितलं. तेव्हा काय चर्चा झाल्या हे मला माहिती आहे. तेव्हा शरद पवार यांनी राज्याचे नेतृत्व उद्धव ठाकरे पूर्ण वेळ करणार असं स्पष्ट केलं होतं.
राऊत पुढे म्हणाले, आमची कमिटमेंट ही पाच वर्षांची आहे. त्यानंतर निवडणुकीला सामोरं जाऊ. मात्र मी नेहमी सांगतो की शिवसेनेचा मुख्यमंत्री राज्यामध्ये दीर्घकाळ काम करेल. तसेच उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाचा पाच वर्षांची टर्म पूर्ण करतील. एवढेच नाही तर ते प्रदीर्घ काळ मुख्यमंत्री राहतील असेही संजय राऊत यांनी म्हंटल.