हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक सदरातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेली मोदींची भेट आणि त्या भेटीवरून निर्माण झालेले तर्क- वितर्क यावर भाष्य करत शिवसेना- भाजप युतीची शक्यता फेटाळली आहे. तसेच अडीच वर्षानंतर मुख्यमंत्री पदावर राष्ट्रवादी दावा ठोकेल ही शक्यताही फेटाळून लावत पूर्ण 5 वर्ष उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री असतील असे छातीठोकपणे सांगितले आहे.
महाराष्ट्रात पुन्हा उलथापालथ होईल व राजकीय समीकरणे बदलतील अशा पुड्या अधूनमधून सोडल्या जात आहेत. मुख्यमंत्र्यांच्या धावत्या दिल्ली भेटीने त्या पुड्या जरा जास्त गरम झाल्या. अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्रीपदावर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दावा सांगितला जाईल व तेथे आघाडीत वादाची ठिणगी पडेल. त्या वादातून राज्यात नव्या राजकीय घडामोडींना वेग येईल, असे जे पसरवले जात आहे त्यात काहीच तथ्य नाही. शिवसेनेला मुख्यमंत्रीपद हा ‘पाच’ वर्षांसाठी दिलेला शब्द आहे, असं म्हणत पाच वर्ष मुख्यमंत्रिपदाच्या गादीवर उद्धव ठाकरेच बसतील असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.
राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. त्यापैकी एक पक्ष बाहेर पडल्याशिवाय सरकार पडणार नाही हे अमित शहा यांनी एकदा स्पष्ट केले. परिस्थिती अद्यापि तीच आहे. ईडी, सीबीआयसारख्या तपास यंत्रणांचा वापर करून एखाद् दुसरा आमदार गळास लागेल, पण त्यातून बहुमताचा आकडा जमणार नाही हे सत्य स्वीकारण्याची मानसिकता विरोधकांनी ठेवायला हवी. सरकार बदलाचा एकही पर्याय यशस्वी होण्याची शक्यता आज तरी दिसत नाही. त्यात मुख्यमंत्री ठाकरे व दिल्लीतील संवाद वाढला आहे व तो थेट पंतप्रधान मोदी यांच्याशी आहे
महाराष्ट्रातील सरकार चालविणे व टिकवणे ही आघाडीतील तिन्ही पक्षांची गरज आहे. “मजबुरी हा शब्द मी मुद्दाम वापरत नाही. केंद्रासह अनेक राज्यांत भाजपचे शासन आहे, पण महाराष्ट्रासारखे राज्य हाती नसेल तर इतर मोठी राज्ये हाती असूनही जीव रमत नाही. काँग्रेसकडे एखाद्-दुसरे राज्य आहे, पण महाराष्ट्राच्या सत्तेतील सहभाग सगळ्यात महत्त्वाचा. राष्ट्रवादी काँग्रेसदेखील महाराष्ट्राबाहेर विस्तारली नाही व हिंदुत्ववादाचा सगळ्यात मोठा ‘ब्रॅण्ड’ ठरूनही शिवसेनेला महाराष्ट्राबाहेर मोठी झेप घेता आली नाही. अशा वेळी महाराष्ट्राची सत्ता टिकवणे हे तीनही पक्षांना आवश्यक आहे.” असेही संजय राऊत यांनी म्हंटल.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.