हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी जिंकल्या तर तो पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा व्यक्तिगत पराभव ठरेल, असे मत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केले. सामनातील रोखठोक सदरातुन देशाच्या राजकीय विषयांवर भाष्य करत मोदी – शहाना पुन्हा एकदा लक्ष्य केले. यावेळी राऊतांनी अनेक राजकीय भाकिते देखील केली.
प. बंगालच्या निकालानंतर अमित शहा हे महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडीत लक्ष घालतील, असे जे सांगितले जाते ते कशाच्या आधारावर? एक तर पैशांचा व बळाचा वापर करून आमदार फोडाफोडी केली जाईल किंवा कोरोना स्थिती हाताळण्यात अपयश आल्याचे कारण देऊन राष्ट्रपती राजवट लावली जाईल.
2 मे नंतर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग येईल, असे म्हणणाऱ्यांना मी एवढेच सांगू इच्छितो की, महाराष्ट्रातील घडामोडींचे हादरे दिल्लालाही बसू शकतात. तसे वातावरण आज देशात आहे. पश्चिम बंगाल हा त्याचा केंद्रबिंदू आहे. कोरोनामुळे देशातील परिस्थिती हाताबाहेर गेली असली तरी देशातील सत्तावाद आणि राजकारण संपलेले नाही. त्यामुळे महाराष्ट्र अस्थिर होईल असे म्हणणाऱ्यांनी दिल्ली स्थिर राहील का, हे सुद्धा पाहावे, असा सल्ला संजय राऊत यांनी दिला.