हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील राजकारणी, पत्रकार आणि संपादक अशा 1500 हून अधिक लोकांचे फोन टॅप झाल्याची बाब उघड झाली आहे. विशेष म्हणजे परदेशी कंपन्या आणि अॅपने हे फोन टॅप केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फोन टॅपिंग हा देशाच्या स्वातंत्र्याला धोका असून पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी स्वत: त्यावर खुलासा केला पाहिजे, असं संजय राऊत यांनी सांगितलं.
संजय राऊत म्हणाले, गेल्या काही वर्षापासून पत्रकार, राजकारणी या देशात भीतीच्या सावटाखाली वावरत आहेत. आपल्यावर पाळत ठेवली जाते, आपले फोन टॅप केले जातात. ही सगळ्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. त्यावर पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्र्यांनी समोर येऊन खुलासा करणं गरजेचं आहे. काही परदेशी कंपन्या, परदेशी अॅप अशा प्रकारे या देशाच्या प्रमुख लोकांचे फोन ऐकत असतील तर या देशातील स्वातंत्र्याला सर्वात मोठा धोका आहे, असं राऊत म्हणाले.
देशाचं शासन आणि प्रशासन कमकुवत आणि दुबळं असल्याचं हे लक्षण आहे. कोणीही ऐरागैरा येतो आणि आमचे फोन टॅप करतो. आमच्याकडे सायबर क्राइम संदर्भात कठोर नियम नाहीत, कायदे नाहीत. सरकारने ज्या पद्धतीने समोर येऊन या सर्व गोष्टींचा मुकाबला करायला हवा. ते दिसत नाही. त्यामुळे देशात सर्वच क्षेत्रात भीतीचं वातावरण आहे. आम्ही हा प्रश्न संसदेत लावून धरणार आहोत असेही राऊत यांनी म्हंटल.