हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांना मुंबई सत्र न्यायालयाने ४ ऑगस्ट पर्यंत ईडी कोठडीची शिक्षा सुनावली आहे. ईडीकडून ८ दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आली होती. अखेर दोन्ही बाजूंच्या सुनावणी नंतर न्यायमूर्ती एम जी देशपांडे यांनी ४ ऑगस्ट पर्यंत म्हणजेच ३ दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे.
संजय राऊतांना आज सत्र न्यायालयात हजर केलं, कोर्ट रूम नंबर १६ मध्ये न्यायाधीश एम.जी. देशपांडे यांच्यासमोर ईडीनं रिमांडसाठी संजय राऊतांना हजर केलं. संजय राऊतांच्या बाजूने जेष्ठ वकील अशोक मुंदरगी यांनी युक्तिवाद केला. तर हितेन वेणेगावक यांनी ईडीच्या वतीने युक्तिवाद केला. ईडीच्या वकिलांनी ८ दिवसाच्या कोठडीची मागणी केली होती मात्र संजय राऊतांना ईडी कोठडीची आवश्यकता असली तरी ८ दिवसांची गरज नाही असे निरीक्षण न्यायमूर्तीनी केलं. आणि राऊतांना ४ ऑगस्ट पर्यंत ईडी कोठडीची शिक्षा सुनावली.
Mumbai | Court sends Sanjay Raut to ED custody till August 4th in connection with Patra Chawl case.
(File photo) pic.twitter.com/nYxihBTdWi
— ANI (@ANI) August 1, 2022
कोर्टात नेमकं काय झालं-
राऊत तपासात सहकार्य करीत नाहीत. तीन वेळा समन्स दिले पण ते उपस्थित राहिले नाही. प्रवीण राऊत हे नावालाच असून संजय राऊत हेच पत्राचाळ घोटाळ्याचे प्रमुख आहेत असा युक्तिवाद ईडीच्या वकिलांनी केला. प्रकल्पाच्या 112 कोटीपैकी 50 कोटी प्रवीण राऊत याना मिळाले. त्यातील 1 कोटी 6 लाख रुपये राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात जमा करण्यात आले होते. त्याच पैशातून राऊत यांनी दादर येथील फ्लॅट आणि अलिबाग येथे जमीन खरेदी केली असा युक्तिवाद करत ईडीच्या वकिलांनी राऊतांची 8 दिवस कोठडीची मागणी केली
तर दुसरीकडे, संजय राऊत तपासात सहकार्य करत आहेत. त्यांना जर कोठडी द्यायची असेल तर कमीत कमी कोठडी द्यावी अशी विनंती राऊतांचे वकील अशोक मुंदरगी यांनी केली. रोख रकमेचा व्यवहार हा जुना आहे मग आत्ता तो काय काढला जात आहे असा सवाल करत राजकीय द्वेषापोटी संजय राऊत यांच्यावर कारवाई केली जात आहे असा थेट आरोप संजय राऊतांच्या वकिलांनी केला.
दरम्यान, संजय राऊत याना हृदय विकाराचा त्रास असल्याने कोर्टाने त्यांना घरचे जेवण आणि औषधाची परवानगी दिली आहे. तसेच सकाळी ८.३० ते ९.३० दरम्यान संजय राऊत वकिलांशी सल्लासमलत करु शकतात आणि १०.३० नंतर त्यांची चौकशी करणार नाही अशी हमी ईडीने कोर्टाला दिली