हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजित पवार यांनी छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल अशा दिग्गज नेत्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी केल्यानंतर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक सदरातून भाजपसह या बंडखोर नेत्यांवर जोरदार निशाणा साधला. छगन भुजबळ, स्वत: अजित पवार हे ईडी- पीडित आहेत. प्रफुल पटेल यांच्या राहत्या घराचे दोन मजले ‘ईडी’ने जप्त केले व तेथे ‘ईडी’चेच कार्यालय थाटले. त्यामुळे पटेलांना झोप कशी लागेल ? आता नव्या राजकीय नाटय़ामुळे पटेल यांना शांत झोप लागेल असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
संजय राऊत नेमकं काय म्हणाले –
दि. 16/4 च्या ‘रोखठोक’ सदरात ‘लोकशाहीची धुळधाण, फोडाफोडीचा सीझन -2’ असे मी परखडपणे लिहिले व अजित पवारांसह आमदारांचा मोठा गट लवकरच राष्ट्रवादीतून बाहेर पडेल हे सांगितले, तेव्हा राज्यात व देशात खळबळ उडाली. राष्ट्रवादीतला आमदारांचा एक मोठा गट भाजपात निघाला आहे, हे तेव्हा खुद्द श्री. शरद पवार यांनी मान्य केले. केंद्रीय तपास यंत्रणांच्या भीतीने हे सर्व पक्ष सोडत आहेत. प्रत्येकाची वैयक्तिक कारणे आहेत. ज्यांना जायचे त्यांनी जावे, पण पक्ष म्हणून त्यां मी पाठिंबा देणार नाही. पवार यांनी तेव्हा एक चांगला मांडला होता तो म्हणजे, “आज जे ईडी वगैरेच्या भीतीने पक्ष सोडत आहेत त्यांना मी सांगतो, तुम्ही भाजपात गेल्याने टेबलावरची फाईल कपाटात जाईल, पण या फायली कधीच बंद होत नाहीत.” हसन मुश्रीफ यांनी भाजपात प्रवेश केला म्हणून त्यांची फाईल बंद केली तर ‘ईडी’ वगैरे यंत्रणांची आधीच घसरलेली विश्वासार्हता कायमची नष्ट होईल. 2024 साली दिल्लीत सत्तांतर होण्याची दाट शक्यता आहे व कपाटातल्या सर्व फायली पुन्हा टेबलावर येतील.
छगन भुजबळ, स्वत: अजित पवार हे ईडी- पीडित आहेत. वळसे-पाटलांचे काय? हे रहस्य आहे. भुजबळांवर भ्रष्टाचाराचे अनेक गुन्हे असताना तुरंगातून सुटून आल्यावर पवारांनी त्यांना महाराष्ट्रात मंत्री करून प्रतिष्ठा दिली. आता हे गुन्हे काढण्यासाठी ते भाजपात गेले. प्रफुल पटेल यांच्या राहत्या घराचे दोन मजले ‘ईडी’ने जप्त केले व तेथे ‘ईडी’चेच कार्यालय थाटले. त्यामुळे पटेलांना झोप कशी लागेल ? आता नव्या राजकीय नाटय़ामुळे पटेल यांना शांत झोप लागेल. श्री. पटेल यांनी इक्बाल मिरचीबरोबर कसे व्यवहार केले हे एकदा स्वतः श्री. मोदी यांनी भाषणात सांगितले. आता मिरच्यांचा ‘गोड हलवा’ झाला! संपूर्ण भारतातील देशबुडव्यांचा मातृपक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाकडे पाहायला हवे. श्री. मोदी बोलतात एक व प्रत्यक्ष कृती दुसरी करतात. हे चित्र आज सर्वत्र दिसते.
अजित पवारांसोबत जे गेले त्या प्रत्येकाचे वैयक्तिक दुःख होते. मुश्रीफ यांच्या कुटुंबियांवर वारंवार ‘ईडी’च्या धाडी पडल्या. तेव्हा मुश्रीफ यांच्या पत्नी बाहेर येऊन त्राग्याने म्हणाल्या, “रोज रोज का छळ करताय? एकदाच काय ते आम्हाला गोळया घालून मारा!” भाजपने ‘ईडी’च्या माध्यमातून छळलेल्या अनेक कुटुंबांची हीच वेदना आहे. ‘देश बुडवणाऱयांनी भाजपात यावे, नाहीतर तुरंगात जावे!’ असा संदेश या बादशहांनी दिला. ज्यांनी भ्रष्टाचार केला व देश बुडवण्यात जे सामील तेच लोक बादशहांपुढे शरण जात आहेत असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपवरही निशाणा साधला.