हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला असं वादग्रस्त विधान भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केल्यानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसाद लाड यांच्यावर निशाणा साधला आहे. कोण प्रसाद लाड? शिवरायांबद्दल बोलायची लायकी आहे का ? अशा शब्दात राऊतांनी फटकारलं आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, कोण प्रसाद लाड? ते काय दत्तो वामन पोतदार आहेत का ? भाजपा मधला कोणीही उठतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक नवीन भाष्य करतो. या भाजपचे डोकं फिरलं आहे. शिवरायांची शक्तीच यांना संपवेल. शिवाजी महाराजांची भवानी तलवारच एकदिवस यांच्या पक्षाचं मुंडकं छाटणार आहे असं त्यांनी म्हंटल. शिवाजी महाराजांवर अशाप्रकारे बोलण्याची यांची लायकी आहे का? छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कुठे झाला?, त्यांच महानिर्वान कुठे झालं? याबाबत अख्ख्या जगाला, देशाला माहिती आहे असेही राऊत म्हणाले.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही प्रसाद लाड यांच्यावर टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला आणि रायगडावर त्यांचं बालपण गेल्याचा जावई शोध लाड यांनी लावला आहे. उद्या गुजरातच्या लोकांना खूश करण्यासाठी शिवाजी महाराजांचा जन्म सुरतला झाल्याचंही हे लोक म्हणतील अशा शब्दात त्यांनी प्रसाद लाड आणि भाजपवर निशाणा साधला.