आम्हाला कुणी मराठी प्रेमाविषयी ज्ञानामृत पाजू नये, राऊतांचा भाजपला टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर शिवसेनेने आंदोलन केलं. शिवसेनेने हुतात्मे दिले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तुरुंगवास भोगला. त्यामुळे मराठी आणि सीमाप्रश्नावर कुणी आम्हाला ज्ञानामृत पाजू नये, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं. महाराष्ट्र एकीकरण समिती गेल्या 65 वर्षांपासून संघर्ष करत आहे. या संघटनेच्या नेतृत्वात आम्ही आंदोलन केलं. शुभम शेळके आता तिकडे लोकसभेची निवडणूक लढत आहेत. त्यांना आम्ही पाठिंबा देण्यासाठी गेलो होतो. हा निव्वळ दौरा नव्हता. आमचे कितीही मतभेद असले तरी महाराष्ट्रातील सर्व पक्षांनी शुभम शेळकेंना पाठिंबा दिला पाहिजे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेतेही तिकडे गेले होते. शुभम शेळके या निवडणुकीत मुसंडी मारतील याचा आम्हाला विश्वास आहे, असं राऊत म्हणाले.

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. आता विरोधी पक्षनेते आहेत. बेळगाव, कारवार महाराष्ट्रात येण्यासाठी मुख्यमंत्री असताना फडणवीसांच्या नेतृत्वातच ठराव झाले आहे. एकीकरण समितीचे लोक जेव्हाही त्यांना भेटायचे तेव्हा आम्ही तुमच्या पाठी ठाम उभे आहोत असं ते सांगायचे. तसं वचनच त्यांनी दिलं होतं. आज एकीकरण समितीला त्यांच्या पाठिंब्याची गरज आहे. तेव्हा फडणवीसांनी वेगळी भूमिका घेतली आहे. बेळगावात मराठी माणसाच्या विरोधात प्रचार करू नये असं आमचं आवाहन आहे. सर्वांनी ते मानलं आहे. फक्त भाजपने वेगळी भूमिका घेतली आहे, महाराष्ट्र त्याची नोंद करून ठेवेल, असं त्यांनी सांगितलं.

सीमा लढ्यात 67 हुतात्मे आम्ही दिले. बाळासाहेब ठाकरेंना तीन वर्षाचा कठोर तुरुंगवास झाला. त्यामुळे सीमावासिय आणि मराठी याबद्दलच प्रेम आम्हाला शिकवण्याची गरज नाही, आम्हाला कुणी ज्ञानामृत पाजू नये. तुमचं मराठी प्रेम दिसून आलं आहे, असा चिमटाही त्यांनी काढला. यावेळी त्यांनी संचारबंदीबाबत भाष्य केलं. मुख्यमंत्री फार सौम्य आहेत. ते माणुसकी आणि दया दाखवत आहेत. लोकांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री अस्वस्थ आहेत. त्यांनी कठोर पावलं उचलली पहिजे, असं सांगतानाच कोरोनाचे नियम पाळा. मुख्यमंत्र्यांना कठोर पावलं उचलण्यासाठी प्रवृत्त करू नये, असं आवाहनही त्यांनी केलं. सरकारला टेकू कसा लावायचा हे अजित पवारांना माहीत आहे. पहाटे शपथ घेऊन दुपारी त्यांनी सरकार स्थापन केलं. अजित पवार हे संपूर्ण ऑपरेशनमध्ये सर्जन आहेत, असंही ते म्हणाले.

Leave a Comment