हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ड्रग प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. फडणवीस यांच्या इशाऱ्यावरून राज्यात ड्रगचा खेळ चालतो अस नवाब मलिक यांनी म्हंटल. त्यांनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांना याबाबत विचारले असता त्यांनी पुन्हा एकदा भाजपवर टीका केली आहे.
संजय राऊत म्हणाले, राजकीय विरोधकांना खोट्या आरोपात अडकवणं, केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग करणं हे मागील २ वर्षापासून सुरु आहे. महाराष्ट्राची ही राजकीय परंपरा नाही. शरद पवारांवर आरोप करताना भाजपाच्या नेत्यांन लाज वाटली पाहिजे, असंही राऊतांनी म्हटलंय. आमच्याही हातात दगड असू शकतात. मात्र, आम्ही संयम बाळगला आहे. कंबरेखालचे वाद आम्हाला नको आहेत असे राऊत म्हणाले.
नवाब मलिकांच्या जावयावर खोटा गुन्हा दाखल केला होता. त्यांच्या मुलीला आणि कुटुंबीयांना ९ महिने त्रासाला सामोरं जावं लागलं. नवाब मलिकांच्या पाठीशी आम्ही सगळेच आहोत असे संजय राऊत यांनी म्हंटल. तसेच ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांनी मांडावे. तपास यंत्रणांनी चौकशी करावी. ज्यांच्यावर आरोप झालेत त्यांनी उत्तरं द्यावीत परंतु महाराष्ट्रात अशी चिखलफेक होऊ नये असं शिवसेनेला वाटतं असं संजय राऊत यांनी सांगितले आहे.