Saturday, January 28, 2023

पियुषजी, राज्यसभेत तुम्ही महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताय हे विसरू नका; राऊतांचा रेल्वेमंत्र्यांना टोला

- Advertisement -

मुंबई । स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावी जाता यावं म्हणून सुरु झालेल्या श्रमिक ट्रेनच्या मुद्द्यावरुन रेल्वेमंत्री आणि राज्य सरकारमध्ये कालपासून ट्विटर वॉर सुरु आहे. या शाब्दिक लढाईत आता शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यावर ट्विटरवर निशाणा साधला आहे. ‘पियुषजी, राज्यसभेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताय हे विसरू नका’ असा चिमटा राऊत यांनी पियुष गोयल यांना लगावला. तसेच १४ मे रोजी रेल्वेकडून चालवण्यात आलेल्या नागपुर-उधमपूर ट्रेनच्या विलंबावरूनही राऊत यांनी रेल्वेमंत्र्यांना लक्ष्य केले.

पियुषजी,१४ मे २०ला सुटलेल्या नागपुर – ऊधमपुर ट्रेन साठी कोठली यादी घेतली होती. आधी ट्रेन नंतर माणसे जमा करण्यासाठी काय कष्ट घेतले, कृपया जाहीर कराल? आता मग यादी कसली मागताय? राज्यसभेत आपण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताय हे विसरू नका” असा टोला राऊत यांनी पियुष गोयल यांना लगावला आहे. १४ मे रोजी चालवण्यात आलेली नागपुर- उधमपूर ट्रेन तब्बल नऊ तास उशीरा आली होती. त्यामुळे या ट्रेनला उधमपूरमध्ये जाण्यासही विलंब लागला होता. या सगळ्यामुळे ट्रेन सुटण्याच्या वेळेत स्टेशनवर आलेल्या मजुरांची मोठी गैरसोय झाली होती यावरच राऊत यांनी रेल्वेमंत्री गोयल यांच्यावर निशाणा साधला. 

- Advertisement -

दरम्यान, संजय राऊत यांनी कालही पियुष गोयल यांच्यावर बोचरी टीका केली होती. महाराष्ट्र सरकारने रेल्वे मंत्रालयास हव्या असलेल्या गाड्यांची यादी सादर केली आहे. पियुषजी, फक्त एक विनंती आहे की ट्रेन ज्या स्टेशनवर पोहोचायला हवी त्याच स्टेशनवर पोचू द्यावी, गोरखपूरला सुटलेली ट्रेन ओरिसाला पोहोचु नये, असे राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”