ही यांची लायकी; बावनकुळेंच्या ‘त्या’ विधानावरून राऊतांचा शिंदेंवर घणाघात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला 240 जागांवर लढावं लागेल कारण शिंदेंच्या शिवसेनेकडे 50  च्या वर आमदारच नाहीत असं विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं होत. त्यांचा हा व्हायरल झालेला व्हिडिओ नंतर डिलिटही करण्यात आला मात्र यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

नाशिक येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांना बावनकुळेंच्या त्या विधानाबाबत विचारलं असता हीच शिंदे गटाची लायकी आहे असं म्हणत त्यांनी टीकास्त्र सोडलं. ज्या शिवसेनेने 2014 मध्ये स्वाभिमानासाठी एका जागेसाठी युती तोडली होती. आणि आता यांच्यावर 25- 40 तुकडे फेकले जात आहेत. यांच्यासमोर आयुष्यभर तुकडेच फेकले जातील आणि हेच तुकडे तोंडात ठेऊनच चगळत चगळत त्यांना जगावं लागेल, यांच्यात कोणताही स्वाभिमान नाही”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

उद्या भाजप शिंदे गटाच्या तोंडावर 5 जागा फेकतील कारण हीच यांची लायकी आहे. भाजपने शिवसेना यासाठी तोडली कारण त्याना महाराष्ट्रातून शिवसेनेचा रुबाब, दरारा खतम करायचा होता. महाराष्ट्राचा स्वाभिमान तोडायचा होता म्हणून त्यांनी शिवसेना तोडली. आणि अशी मिंधी लोक त्यांनी फेकलेल्या तुकड्यावर जगत आहेत असं म्हणत संजय राऊत यांनी शिंदे गटावर तोफ डागली. तसेच खरी शिवसेना कोणती याचा फैसला जनता करेल असेही संजय राऊत म्हणाले.

बावनकुळे नेमके काय म्हणाले होते?

भाजपच्या प्रसिद्धी प्रमुखांची काल बैठक पार पडली. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना मार्गदर्शन करताना थेट जागावाटपाचा आकडाच सांगितला. 2024 मध्ये भाजपचे 150 ते 170 आमदार निवडून येतील. आपण 240 च्या आसपास जागा लढण्याच्या विचारात आहोत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे 50 पेक्षा जास्त आमदारच नाहीत. त्यामुळे आपण विधानसभा निवडणुकीत 235-240 जागा लढवल्या तर तेव्हा तुम्हाला खूप काम करावे लागेल, असे बावनकुळे यांनी म्हटले होते. त्यामुळे शिंदे गटाची 48 जागांवरच बोळवण होणार का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.