हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या सत्ता नाट्याचा शेवट एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होत संपला. खर तर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील अस सर्वाना वाटत असताना मोदी- शहानी मास्टरस्ट्रोक खेळत मुख्यमंत्री पदाची माळ एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात टाकली. याचवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक सदरातून फडणवीसांना डिवचले आहे. फडणवीस यांना उपमुख्यमंत्री स्वीकारावे लागले हाच खरा भुकंप आहे अस म्हणत ते पुन्हा आले, पण असे अर्धवट येतील अस कोणाला वाटलं नव्हतं असा टोला संजय राऊतांनी लगावला.
महाराष्ट्रात भूकंप झाला व असा भूकंप राजकारणात कधी झालाच नव्हता असे वर्णन एकनाथ शिंदेंच्या बंडाबाबत झाले, पण त्या बंडापेक्षा मोठा भूकंप नऊ दिवसांनी झाला. शिंदे यांच्या बंडामागचे चाणक्य म्हणून संपूर्ण मीडिया देवेंद्र फडणवीस यांना श्रेय देत होता, पण सत्य वेगळेच होते. हे बंड थेट दिल्लीच्या सूत्रधारांनी घडवले व महाराष्ट्रातील भाजप त्याबाबत पूर्ण अंधारात होता. एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील असे जे बोलत होते ते नंतर कोसळले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले व देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांच्या हाताखाली उपमुख्यमंत्री व्हावे असे फर्मान भाजप हायकमांडने सोडले. हाच खरा भूकंप आहे अस राऊत म्हणाले.
पुन्हा मुख्यमंत्री होण्याची झेप फडणवीस यांच्या दिल्लीतील नेत्यांनी रोखली व शिंदे यांना बळ दिले. फडणवीस यांच्यासाठी हा धक्का आहे. महाराष्ट्र भाजपचे एकतर्फी नेतृत्व फडणवीस यांच्या हाती होते, पण अमित शहा व फडणवीसांत सख्य नव्हते. “मला उपमुख्यमंत्रीपद नको. चंद्रकांत पाटील यांना ते द्या. मला भाजप प्रदेशाध्यक्ष करा”, अशी त्यांची विनंती शेवटच्या क्षणी फेटाळण्यात आली.
कधी काळी आपलाच ज्युनियर मंत्री असलेल्या श्री. शिंदे यांच्या हाताखाली काम करण्याची वेळ फडणवीस यांच्यावर आली. हे त्यांच्या कर्माचे फळ आहे. 2019 मध्ये सत्तेचा 50-50 टक्के फॉर्म्युला त्यांनी स्वीकारला नाही व महाविकास आघाडीचे सरकार त्यामुळे निर्माण झाले. श्री. उद्धव ठाकरे हे अडीच वर्षे मुख्यमंत्री झाले व आता बंडखोर शिवसैनिक शिंदे यांना हे पद भाजप हायकमांडने दिले. काळाने फडणवीसांवर घेतलेला हा सूड आहे अशा शब्दांत राऊतांनी निशाणा साधला.
महाराष्ट्राचे राजकारण हे आता आदर्श राहिलेले नाही. त्याची खिचडी झाली आहे. सध्या नवे राज्य आले आहे. ज्यांनी ते आणले ते सुखात नांदोत. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद सोडले, पण राज्यातील लोक त्यांच्या सत्तात्यागाने हळहळले.ठाकरे यांनी हेच कमवले. शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद मिळविले. या सगळ्यात श्री. फडणवीसांच्या आयुष्यात भूकंप झाला!