काँग्रेस नसती तर मोदी-शहांना इंग्रजांची चाकरी करावी लागली असती; राऊतांची जोरदार बॅटिंग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नसती तर काय झाले असते? असे एक पुस्तक आज भाजपाकडून प्रकाशित करण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हे पुस्तक चर्चेचा विषय ठरत आहे. मात्र या पुस्तकावरून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. काँग्रेस नसती तर भारताला स्वातंत्र्य मिळालं नसत आणि मोदी शहांना अजूनही ब्रिटिशांची चाकरी करावी लागली असती असं म्हणत संजय राऊतांनी काँग्रेसच्या चांगल्या कामांचा पाढाच वाचला. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, काँग्रेस (Congress) नसती तर देशाला स्वातंत्र्य मिळालं नसत. नरेंद्र मोदी (Narendra Modi) , अमित शाह (Amit Shah) आणि देवेंद्र फडणवीस याना अजूनही ब्रिटिशांची चाकरी करावी लागली असती. काँग्रेस नसती तर देशाला पंडित नेहरू यांच्यापासून ते मनमोहन सिंग यांच्यापर्यंत नेतृत्व मिळालं नसतं , काँग्रेस नसती तर पाकिस्तनाचे २ शकते झाले नसते, काँग्रेस नसती तर देश अखंड राहिला नसता, ज्ञान- विज्ञान आणि तंत्रज्ञानात भारताची प्रगती झाली नसती, काँग्रेस नसता तर हा देश जादूटोणा- छू-मंतर, बुवा- महाराजांच्या हातात गेला असता, जो आज गेलाच आहे. … भाजपवाल्याना हे कळणार नाही कारण ते फक्त व्यापाराचा आणि उद्योगपतींचा विचार करतात असं संजय राऊत यांनी म्हंटल.

पंडित नेहरूंचे आदर्श नेतृत्व या देशाला काँग्रेसमुळे मिळाले, लालबहाद्दूर शास्त्री मिळाले, इंदिरा गांधी मिळाल्या… ज्यांनी तुमच्या हातात मोबाईल दिला ते राजीव गांधी काँग्रेसमुळेच देशाला मिळाले असं संजय राऊतांनी सांगितलं. त्यापेक्षा जर भाजप नसती तर देशाची प्रतिष्ठा अजून वाढली असती, रुपयांची किंमत वाढली असती, देशावरील कर्ज कमी झालं असत, देशात दंगे झाले नसते. देशातून उद्योगपती पळून गेले नसते, राफेल घोटाळा झाला नसता असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर तोफ डागली.