हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल गुढीपाडवा निमित्त आयोजित मेळाव्यात ठाकरे सरकार वर चौंफेर टीका केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारल असता त्यांनी राज ठाकरेंचा खरपूस समाचार घेतला. अक्कल दाढ एवढी उशिरा कशी येते? याचा अभ्यास करावा लागेल असा चिमटा संजय राऊत यांनी काढला.
संजय राऊत म्हणाले, भाजप आणि शिवसेनेत काय झालं ते आम्ही पाहू. तिसऱ्या व्यक्तीची गरज नाही आत यायची. आम्ही आमचं पाहून घेऊ. तुम्ही तुमचं पाहा, तुम्हाला एवढं उशिरा कसं आठवलं? अक्कल दाढ एवढी उशिरा कशी येते? याचा अभ्यास करावा लागेल. काल शिवाजी पार्कात भाजपचाच भोंगा सुरू होता. भाजपचीच स्क्रिप्ट होती. भाजप त्यांची मळमळ दुसऱ्यांच्या भोंग्यातून बाहेर काढत आहे.
राज ठाकरे यांनी पवारांवर जातीपातीच्या मुद्द्यांवरून टीका केल्यानंतर संजय राऊत यांनी त्यावरूनही निशाणा साधला. पवारांच्या चरणाशी तुम्हीही जात होतात सल्लामसलत करायला. कशा करता आपण टोलेजंग माणसावर बोलायचं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार ही टोलेजंग माणसं आहेत. त्यांच्यावर कशाला बोलता असे म्हणत संजय राऊतांनी राज ठाकरेंना फटकारले.