अहो आगलावे बोम्मई मिटवायचे की पेटवायचे….; शिवसेनेचा सामनातून कर्नाटक सरकारवर निशाणा

Sanjay Raut Basavaraj Bommai
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादावरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान कर्नाटक मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे वादग्रस्त वक्तव्य करत असल्याने हा वाद पुन्हा वाढत आहे. यावर आज सामनातून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा बोम्मईंवर निशाणा साधला आहे. “कर्नाटकची एक इंचही जमीन देणार नाही असे बोम्मई यांचे म्हणणे आहे. महाराष्ट्रालाही कर्नाटकची इंचभरही जमीन नकोच आहे. बोम्मई यांनी एक सांगावे, त्यांना हा वाद मिटवायचा आहे की पेटवायचा आहे? त्यावर महाराष्ट्र आपली भूमिका ठरवेल ! असा थेट सवाल राऊतांनी विचारला आहे.

संजय राऊत यांनी सामना म्हंटले आहे की, महाराष्ट्राने संयम राखला आहे व तीच महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी मध्यस्थी करून देखील बोम्मई आपला हेका आणि ठेका सोडायला तयार नाहीत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद अचानक चिघळला आणि उफाळला तो फक्त बोम्मई यांच्यामुळेच. सीमा प्रश्नाचे घोंगडे सर्वोच्च न्यायालयात भिजत पडले असताना बोम्मई यांनी एक इंच काय, अर्धा इंचही जमीन महाराष्ट्रास देणार नाही, असा फटाका फोडला.

महाराष्ट्राच्या विधानसभेत थातूरमातूर विषयांवर खोके सरकार नंगानाच करीत आहे आणि तिकडे कर्नाटक सरकारने महाराष्ट्राविरोधात निषेधाचाच ठराव मंजूर करून चपराक लावली आहे. हे समजत नसेल तर निर्लज्जपणाची हद्दच झाली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री वगैरे लोक दिल्लीत सीमाप्रश्नी बैठकीसाठी गेले तेव्हा फक्त पंधरा मिनिटांत हारतुरे, स्वागत, फेटा बांधणे व चर्चा असे सोपस्कार आटोपून दोन्ही राज्यांनी परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवावी असे ठरले.

पण दिल्लीतून कर्नाटकात पाऊल टाकताच बोम्मई यांनी शब्द फिरवला व पुन्हा तोच मृदंग एकाच बाजूला वाजवायला सुरुवात केली. आता त्यांनी कर्नाटकच्या विधानसभेत महाराष्ट्राने निर्माण केलेल्या वादाचा निषेध ठराव मांडला व मंजूर करून घेतला. अशा निषेध ठरावाची गरज होती काय? असा सवाल राऊतांनी केला आहे.