ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; ट्विट करत म्हणाले…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी सकाळी ईडीचे अधिकारी दाखल झाले. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी तब्बल साडे नऊ तासांच्या चौकशीनंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी राऊतांना ताब्यात घेतले. त्यानंतर राऊतांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “आज माझ्यावर झालेल्या कारवाईतून शिवसेनेला बळ मिळत असेल तर शिवसेनेसाठी मी बलिदान द्यायला तयार आहे. उद्धव ठाकरे यांना त्रास देण्यासाठी माझ्यावर सुडाची कारवाई केली जात आहे. मी बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक आहे. झुकेगा नहीं, ईडीचे अधिकारी मला अटक करायला निघाले आहेत, मी तयार आहे,” असे राऊतांनी म्हंटले आहे.

ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्यानंतर राऊतांनी ईडीच्या कार्यालयाबाहेरून माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मला कोणतीही नोटीस न देता पहाटे ईडीच्या अधिकारी माझ्या घरी आले. माझ्या मुलीला दुसऱ्या ठिकाणी नेलं. त्यांनी पत्राचाळ प्रकरणी साडे नऊ तास माझी चौकशी केली. मात्र, त्यांना माझ्याकडे काहीच पुरावे सापडले नाहीत. कोणता पत्रा गंजलेला आहे कि स्टीलचा तो मला माहिती नाही. ती चाल कुठली आहे हे मला माहिती नाही. पण तरीही माझी चौकशी केली. ठरलेले आहे कि शिवसेना मोडायची, तोडायची, माझा आवाज बंद करायचा.

उद्धव ठाकरे यांना कमजोर करायचं, यासाठी हि कारवाई आहे. पण अशाने शिवसेना आणि महाराष्ट्र कमजोर होणार नाही. उलट आजच्या माझ्यावरील ईडीच्या कारवाईतून शिवसेनेला आणि महाराष्ट्राला लढण्याचे बळ मिळणार असेल तर मी माझं बलिदान द्यायला तयार आहे, असे राऊतांनी माध्यमांशी बोलताना म्हंटले.

 

महाराष्ट्र कमजोर होतोय पेढे वाटा – राऊत

संजय राऊत यांना ताब्यात घेतल्यानंतर ईडीचे अधिकारी ईडी कार्यालयाबाहेरून घेऊन आले असता त्यांनी शिंदे गटावर निशाणा साधला. ते म्हणाले की, माझ्यावर कारवाई करून महाराष्ट्राला कमजोर करण्यासाठीचा प्रयत्न केला जात आहे. महाराष्ट्र कमजोर होतोय पेढे वाटा, अरे बेशरम लोक आहेत तुम्ही, लाज वाटली पाहिजे तुम्हाला, अशी टीका राऊतांनी शिंदे गटावर केली.

राऊतांचे सूचक ट्विट

ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी ट्विट केले. त्यामध्ये त्यांनी म्हंटले कि, “आप ऊस व्यक्ती को नहीं हरा सकते.. जो कभी हार नहीं मानता ! झुकेंगे नही! जय महाराष्ट्र, “असे सूचक ट्विट राऊतांनी केले आहे.