हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभरात पेटला आहे. त्यामध्येच जालन्यात झालेल्या घटनेने तर राज्यात तणावपूर्ण स्थिती निर्माण केली आहे. शुक्रवारी मराठा आरक्षण मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या तरुणांवर लाठीचार्ज करण्यात आला. ज्यामध्ये अनेक तरूण जखमी झाले. या घटनेनंतर संपूर्ण राज्यभरातून संतापाची लाट उसळली आहे. मुख्य म्हणजे, अशा परिस्थितीत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. “सरकारला निवडणुकीपूर्वी राज्यात दंगल घडवायची आहे. त्याची पहिली ठिणगी जालन्यातून पडली आहे” अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
काय म्हणले संजय राऊत
आज माध्यमांशी संवाद साधताना, “निवडणुकीत विविध मार्गाने दंगली घडवल्या जातील हे मी सांगत होतो. त्याला जालन्यातील लाठीमाराचं प्रकरण प्रमाण आहे. महाराष्ट्रात जाळपोळ झाली. हे सरकारचं अपयश आहे. सरकारला हेच हवं आहे. निवडणुकीआधी राज्यात जातपात, धर्मावर दंगल घडवायची आहे. त्याची पहिली ठिणगी जालन्यातून पडली आहे” असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी लावला आहेत. त्यांच्या या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पुढे बोलताना, “गृहमंत्री कोण आहेत? खातं कुणाकडे आहे? आमच्या सरकारमध्ये आंदोलनं झाली. पण कधी लाठीमार केला नाही. या आंदोलकांवर हल्ला का केला? यामागे राजकीय सूसूत्रता आहे. मुंबईत इंडियाची बैठक सुरू होती. देशातील जनता या इंडियाच्या बैठकीकडे लक्ष देऊन होती. इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची भाषण सुरू होती. सर्व चॅनलवर दाखवलं जात होतं. त्यावरून लक्ष हटवण्यासाठी जालन्यात लाठीमार करून गोंधळ निर्माण केला गेला” असा दावा राऊत यांनी केला आहे.
जालन्यात काय घडले?
गेल्या २९ ऑगस्टपासून जालन्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू होते. या आंदोलनादरम्यान मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत चालली होती. मात्र तरी देखील आंदोलन थांबवण्यात आले नाही. शुक्रवारी आंदोलनास्थळी थेट पोलीस दाखल झाले. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये चर्चा झाली. यानंतर थेट पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. ज्यामुळे परिसरात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली. आता या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण राज्यावर पडले आहेत. चहू बाजूंनी पोलिसांच्या या कारवाईचा निषेध केला जात आहे.