‘या’ सरकारी योजनेअंतर्गत श्रमिकांना मिळणार वार्षिक ३६ हजार रुपये पेन्शन; अशी करा नोंदणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । कोरोना व्हायरसच्या संकटात सरकारकडून सध्या दोन प्रकारच्या योजना चालवल्या जात आहेत. आत्मनिर्भर भारत (Aatmnirbhar Bharat) आर्थिक पॅकेज आणि पंतप्रधान गरीब कल्याण योजना. या दोन्ही योजनांमुळे सर्वसामान्य, गरीब आणि शेतकरी वर्गाला फायदा होणार आहे. सरकारने असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी पेन्शन योजना सुरु केली आहे. प्रधानमंत्री श्रम योगी मान धन योजना, असं या योजनेचं नाव आहे. या योजनेद्वारे 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर व्यक्तीला प्रत्येक महिन्याला 3 हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. म्हणजे वार्षिक ३६ हजार रुपये मिळणार आहेत.

यांना घेता येईल योजनेचा लाभ
या योजनेअंतर्गत कचरा वेचणारे, घरकाम करणारे, रिक्षा चालक, धोबी आणि शेतमजुरांना फायदा होणार आहे. त्याशिवाय पेन्शन घेणाऱ्या लाभार्थीचा मृत्यू झाल्यास, मृत्यूनंतर त्याला मिळणाऱ्या पेन्शनची 50 टक्के रक्कम लाभार्थीच्या जीवनसाथीला मिळणार आहे. भारतात जवळपास 42 कोटी लोक असंघटित क्षेत्राशी जोडलेले आहेत. हे लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. 6 मेपर्यंत जवळपास 64.5 लाख लोकांनी यासाठी नोंदणी केली आहे.

या योजनेबाबत नियम, अटी
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याकरता वयोमर्यादा 18 ते 40 वर्ष असावी. या योजनेद्वारे असंघटित क्षेत्राशी जोडलेला कोणताही कामगार, ज्याचं वय 40 वर्षांहून कमी आहे आणि त्याने आतापर्यंत कोणत्याही सरकारी योजनेचा फायदा घेतला नसेल असा व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतो. या योजनेसाठी नोंदणी करणाऱ्या व्यक्तीचं महिन्याचं वेतन 15000 रुपयांहून अधिक असू नये. 18 व्या वर्षात या योजनेशी जोडल्यास त्या व्यक्तीला 55 रुपये प्रतिमाह जमा करावे लागणार आहेत. तर 29 वर्ष वय असल्यास 100 रुपये आणि 40 वर्षीय कामगाराला 200 रुपये भरावे लागणार आहेत. हा सर्वाधिक प्रिमियम आहे. ही रक्कम वयाच्या 60व्या वर्षापर्यंत जमा करावी लागणार आहे.

नोंदणीसाठी आवश्यक गोष्टी
नोंदणी करण्याकरता कामगाराकडे मोबाईल फोन, बचत बँक खातं आणि आधार कार्ड असणं अनिर्वाय आहे. या योजनेसाठी सामान्य सेवा केंद्रावर जाऊन आधार क्रमांक आणि बचत बँक खातं किंवा जन धन खाते क्रमांक स्वत: प्रमाणित करुन नोंदणी करु शकता. एकदा नोंदणी झाल्यानंतर कामगाराची संपूर्ण माहिती ऑनलाईन माध्यमातून सरकारकडे जमा होईल. अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक 18002676888 वर माहिती घेता येऊ शकते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”