कराड | कराड सोसायटी गटातील लढतीकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. कारण सहकारमंत्री बाळासाहेब पाटील हे स्वतः या ठिकाणी निवडणूकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. राष्ट्रवादीचे मंत्री असलेले बाळासाहेब पाटील यांना विजयश्री खेचून आणण्यासाठी भाजचे प्रदेश सरचिटणीस डाॅ. अतुल भोसले यांच्या मतांची गरज होती. त्यामुळे अर्ज भरल्याच्या दिवसापासून भोसले गटाशी जवळीकता राष्ट्रवादीचे मंत्री श्री. पाटील यांनी केली होती. मात्र उघडपणे दोन्ही नेते आले नव्हते, मात्र रविवारी दि. 21 रोजी मतदानाच्या अगोदर 12 तास दोन्ही नेत्यांनी कराड येथील पकंज हाॅटेलमध्ये मतदारांचा दिमाखदार मेळावा एकत्रित घेतला. त्यानंतर मतदाना दिवशी सकाळी 8 वाजताच डाॅ. अतुल भोसले व डाॅ. सुरेश भोसले यांनी हजेरी लावत, स्पष्टपणे सहकार मंत्र्याच्या गटासोबत असल्याचे दाखवून दिले.
सहकारमंत्री बाळासाहेब पाटील आणि अॅड. उदयसिंह पाटील यांच्यात कराड सोसायटी गटातून काटे की टक्कर पहायला मिळत आहे. कराड सोसायटी गटात विजय मिळविण्यासाठी भाजपचे प्रदेश सरचिटणीस डाॅ. अतुल भोसले गटाची मदत मिळणाऱ्या उमेदवाराला विजयाचा हक्क असल्याचे लोक समजत आहेत. गेल्या काही दिवसापूर्वी अॅड. उदयसिंह पाटील यांनी कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत माजी चेअरमन अविनाश मोहिते यांना उघडपणे मदत करत भोसले गटाला विरोध केला होता. मात्र 2009 साली डाॅ. अतुल भोसले आणि पालकमंत्री बाळासाहेब पाटील हे विधानसभेला एकमेकांच्या विरोधात होते. त्यामुळे भोसले गट तटस्थ राहील अशी आशा व्यक्त केली जात होती, किंवा सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना मदत करेल असेही म्हटले जात होते.
गेल्या चार दिवसापूर्वी सहकार पॅनेलच्या कार्यकर्त्यांचा मेळावा कराड येथे आयोजित केला होता. या मेळाव्यास डाॅ. सुरेश भोसले उपस्थित राहणार असल्याचे सहकार मंत्र्यांच्या गटाकडून सांगितले जात होते. परंतु प्रत्यक्षात डाॅ. सुरेश भोसले उपस्थित राहिले नव्हते. त्यामुळे भोसले गटाची भूमिका स्पष्ट होत नव्हती. त्याचवेळी 15 दिवसापूर्वी एका पत्रकार परिषदेत डाॅ. अतुल भोसले यांनीही योग्य वेळी निर्णय घेतला जाईल असे सूचक वक्तव्य केले होते. त्याप्रमाणे निवडणुकीला अगदी 12 तास बाकी असताना भाजप व राष्ट्रवादीचा कार्यकर्त्याचा मेळावा झाला. या मेळाव्यास सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, कृष्णा कारखान्यांचे चेअरमन डाॅ. सुरेश भोसले, भाजपचे डाॅ. अतुल भोसले, कृष्णा कारखान्यांचे माजी चेअरमन मदनराव मोहिते, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, विद्यमान उपाध्यक्ष जगदीश जगताप, देवराज पाटील, विजयनगर येथील सुनिल पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.