सातारा जिल्हा बॅंक निवडणूक : निवडणुकीसाठी पाटील, उंडाळकरांकडून मोर्चेबांधणी सुरू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

सातारा जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणूक लागली आहे. या निवडणुकीसाठी बॅंकेच्या कराड सोसायटी गटातून सहकारमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील व दिवंगत माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांच्यानंतर त्यांचे पुत्र अॅड. उदयसिंह पाटील- उंडाळकर या दोघांच्यामध्ये लढत होत आहे. दोन्ही नेत्यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.

विशेष म्हणजे बॅंकेच्या कराड सोसायटी गटातील विजयासाठी भाजपचे सरचिटणीस अतुल भोसले यांची मते निर्णायक ठरणार आहेत. त्यांच्या मतांवर पालकमंत्री व उंडाळकरांचे बारीक लक्ष आहे. त्यामुळे भोसलेंची मते कोणाच्या पारड्यात पडणार? याची उत्सुकता लागून आहे. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी राजकीय घडामोडी वेगात सुरू आहेत. यावेळच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सर्वच पक्ष सक्रिय झाले होते. प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी जिल्हा बॅंकेसाठी आपल्यालाच उमेदवारी मिळावी, यासाठी व्यूहरचना आखल्या होत्या.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सर्वपक्षीय नेत्यांना विचारात घेऊन जिल्हा बॅंकेची निवडणूक बिनविरोध करण्याची भूमिका घेतली होती. मात्र, त्याला यश आले नाही. इच्छुकांची संख्या वाढल्याने जिल्हा बॅंकेच्या 21 जागांपैकी 11 जागा बिनविरोध झाल्या, तर उर्वरित दहा जागांसाठी निवडणूक लागली आहे. निवडणुकीसाठी 20 मातब्बर उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यासाठी नेत्यांनी जोरदार ‘फिल्डिंग’ लावली आहे.

राज्याचे सहकार खाते ताब्यात असलेले सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनीही सोसायटी गटातूनच शड्डू ठोकला आहे. त्यांनी चांगलीच तयारी केली असून, त्यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकाही होऊन मतदारांच्या संपर्कासाठी त्यांनी काम सुरू आहे. दरम्यान, जिल्हा बॅँकेची घडी बसवून ती बॅँक नावारूपास आणलेले माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर यांचे निधन झाल्याने त्यांचे वारसदार पुत्र अॅड. उदयसिंह उंडाळकर यांनी सोसायटी गटातूनच निवडणूक लढविण्याचे शिवधनुष्य उचलले आहे. त्यासाठीची व्यूहरचनाही रयत संघटनेच्या माध्यमातून त्यांनी केली आहे.

उमेदवारीसाठी उंडाळकरांनी घेतली शरद पवारांची दोनदा भेट…

माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर यांचे पुत्र अॅड. उदयसिंह उंडाळकर यांनी जिल्हा बॅंकेच्या उमेदवारीसाठी पूर्वीपासून प्रयत्न सुरु केले आहेत. त्यांनी यापूर्वीही दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली आहे. जिल्हा बॅंकेसाठीच्या सोसायटी गटात १४० मते आहेत.

उदयसिह पाटील – उंडाळकरांसाठी माजी मुख्यमंत्र्यांची पवारांशी चर्चा…

काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. तसेच यावेळी सिल्व्हर ओकवर झालेल्या चर्चेवेळी चव्हाण यांनी माजीमंत्री विलासराव पाटील उंडाळकर यांचे पुत्र उदयसिह पाटील उंडाळकर यांना जिल्हा बॅंकेसाठी संधी द्यावी, अशी मागणी पवारांकडे केली होती. मात्र, माजी मुख्यमंत्री चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश आले नाही त्यामुळे उदयसिह पाटील उंडाळकर यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे.