हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील मटका किंग समीर कच्छी याच्या जिल्ह्याबाहेर पसरलेल्या मटक्याच्या जाळ्यावर स्थानिक पोलिसांकडून आता कारवाईची मोहीम राबविली जात आहे. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्यावतीने वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथील एका मटका बुकीला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सात दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. पंकज अशोकराव परळीकर (वय 30, रा. मंगरुळपीर, जिल्हा वाशिम) असे अटक करण्यात आलेल्या मटका बुकीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, साताऱ्यातील मटका किंग समीर कच्छी याच्यावर मोठ्या संख्येने गुन्हे विविध पोलिस ठाण्यात दाखल आहेत. समीर कच्छीसह त्याच्या टोळीला पोलिसांनी महिनाभरापूर्वीच खासगी सावकारी, दरोडा या गुन्ह्यांमध्ये अटक केली आहे. सध्या समीर कच्छीसह त्याच्या टोळीतील 41 जणांना मोक्का लावण्यात आला आहे. यादरम्यान पोलिसांनी समीर कच्छीकडे कसून चाैकशी केल्यानंतर त्याचे जिल्ह्याबाहेर मटक्याचे जाळे असल्याचे पोलिसांसमोर आले. कच्छी याच्याकडून माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक दोन दिवसांपूर्वी वाशिमला रवाना झाले होते.
या पथकाने वाशिममध्ये सापळा रचून मटका बुकी पंकज परळीकर याला अटक केली. त्याला साताऱ्यात आणल्यानंतर पोलिसांनी त्याची कसून चाैकशी केली. त्यावेळी त्याने समीर कच्छीसाठी काम करत असल्याची कबुली दिली. पंकज हा वाशिममधील मोठा मटका बुकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई पोलिस अधीक्षक समीर शेख, पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.




