Sunday, June 4, 2023

शरद पवारांविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या केतकी चितळेवर गुन्हा दाखल करा.

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

मराठीतील छोट्या पडद्यावरील अभिनेत्री केतकी चितळे हिने आज तिच्या फेसबुक अकाउंटवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दलची एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली. या पोस्टनंतर तिच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, केतकीने केलेल्या प्रकारामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांतून संताप व्यक्त केला जात आहे. केतकी विरोधात ठिकठिकाणी पोलीस ठाण्यात तक्रारही दिली जात आहे. याचे पडसाद सातारा जिल्ह्यातही उमटले असून आज सातारा जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दिली आहे.

सातारा जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा समिंद्रा जाधव यांनी आज जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले असून केतकी चितळे हिच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, केतकी चितळे नामक व्यक्तीने आपल्या ट्विटर, फेसबुक अकाऊंटवरून एक कविता पोष्ट केली होती. जी देशाचे नेते ज्यांची राजकारण, समाजकारण, लोकनेते म्हणून उभी हयात गेलेली आहे. महाराष्ट्राला विविध क्षेत्रामध्ये गती देऊन लोकविकासाच सातत्याने ज्यांनी काम केले.

अनेक धोरणात्मक निर्णयांमध्ये देशाला पॅटर्न देणारे महाराष्ट्र ज्यांच्यामुळे ठरले ते शरदचंद्र पवार यांचे विकृत विडंबन केतकी चितळे यांनी स्वतः च्या ट्विटर व फेसबुक अकाउंटद्वारे केलेले आहे. यापूर्वीही आक्षेपार्ह सामाजिक ऐक्य धोक्यात येईल अशा पोष्ट केल्यामुळे ऍट्रॉसिटीसारखे गुन्हे दाखल असताना जाणीवपूर्वक अशा पोष्ट करणे कितपत योग्य आहे. अशा प्रवृत्ती समाजाला घातक आहेत तरी केतकी चितळे विरुध्द कलम 505 (2), 500, 501, 507, 153 A IPC, IT Act नुसार गुन्हा करण्यात यावा व अशा प्रवृत्तीला आळा बसवावा, अशी मागणी सातारा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

काय केली आहे केतकी चितळेने फेसबुक पोस्ट?

मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने आपल्या फेसबुक अकाउंटवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दलची एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली आहे. केतकीने तिच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहले की, तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll, ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक, सगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे ll, समर्थांचे काढतो माप l ते तर तुझ्या बापाचेही बाप ll, ब्राह्मणांचा तुला मत्सर l कोणरे तू ? तू तर मच्छर ll, भरला तुझा पापघडा l गप! नाही तर होईल राडा ll, खाऊन फुकटचं घबाड l वाकडं झालं तुझं थोबाड ll, याला ओरबाड त्याला ओरबाड l तू तर लबाडांचा लबाड ll असा ओळी केतकीने तिच्या फेसबुक अकाऊंटवरून शेअर केल्या आहेत.