सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
महाराष्ट्रात गुटखाबंदी असताना कर्नाटकातून अवैध गुटख्याची वाहतूक करणारा टेम्पो ताब्यात घेऊन पोलिसांनी तब्बल 16 लाख 94 हजारांचा गुटखा जप्त केल्याची घटना समोर आली आहे. सातारा जिल्ह्यातील तळबीड पोलिसांनी ही कामगिरी केली आहे. पोलिसांनी थांबण्यास सांगूनही मनाई करत पुढे गेलेल्या टेम्पोचा सिनेस्टाइल पाठलाग करून पोलिसांनी 2 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. विलास बलू जाधव (वय 45) रा. निगडी ता. पिंपरी चिंचवड जि. पुणे मुळ रा.सनमडी ता. जत सांगली व क्लिनर सचिन संजय रेड्डी (वय 20) रा. कुमठा ता औसा जि.लातूर असे सदर आरोपींची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कि, महाराष्ट्र राज्यात गुटखा विक्री करण्यासाठी बंदी असल्याने कर्नाटक राज्यातून टैम्पो क्र एम.एच 14 के क्यु 4187 मधून गुटख्याची विक्री होणार आहे अशी माहिती पोलिसाना खात्रीदायक सूत्रांकडून मिळाली होती. त्यानंतर तळबीड पोलिसांनी तासवडे टोलनाका येथे थांबून वाहनाची तपासणी करण्यास सुरुवात केली. त्यादरम्यान, 11:50 वाजता एक अशोक लेलन्ट टैम्पो नं एम.एच 14 के क्यू 4187 टोल भरून जात असाताना त्यात थांबण्याचा इशारा पोलिसांनी केला. परंतू तो न थांबता तसाच निघून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात गेला. यानंतर पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन त्यास वराडे वराडे ता. कराड गावच्या हद्दीत टेम्पोला गाठले आहे चालकाची चौकशी केली.
चालकाने उडवाउडवीची उत्तरे देताच पोलिसांनी सदर टेम्पो ताब्यात घेऊन आतमध्ये पाहणी केली. यावेळी विमल गुटखा व बी-1 तंबाखूची 42 पोती पोलिसाना सापडली. हा गुटखा हा कर्नाटकातून पुण्याला घेवून जात असल्याची माहिती चालकाने दिली. त्यानंतर चालक आणि क्लिनर या दोघांविरुध्द तळबीड पोलीस ठाणे गुरनं १०३ / २०२३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर प्रकरणाचा तपास श्री एस. एम. पिसाळ पो. उपनिरीक्षक तळबीड पोलीस ठाणे हे करीत आहेत.