सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
राज्यात पोलीस शिपाई भरतीसाठी राज्यभरातून लाखोंच्या संख्येने उमेदवारांनी आपले अर्ज केले आहेत. त्यांची नुकतीच शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यात आली. यानंतर आता लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. सातारा जिल्ह्यात पोलीस भरतीच्या लेखी परिक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची तात्पुरती निवड यादी 17 मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर आता लेखी परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली असून लेखी परीक्षा दि. 02 एप्रिल 2023 रोजी 8.30 ते 10.00 या वेळेत होणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली आहे.
जाहीर करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे की, सातारा जिल्हा पोलीस भरती 2021 मधील लेखी परीक्षेस पात्र झालेल्या उमेदवारांची साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाविद्यालय, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व धनंजयराव गाडगीळ महाविद्यालय या ठिकाणी ही परिक्षा होणार आहे. लेखी परीक्षेस पात्र असलेल्या उमेदवारांनी नमुद परीक्षा केंद्रावर 2 (दोन) तासपूर्वी पोहोचणे आवश्यक आहे. परीक्षेस येण्यास विलंब झाल्यास कोणतीही सबब विचारात घेतली जाणार नाही, अशा उमेदवारांना परिक्षा केंद्रामध्ये प्रवेश दिला जाणार नाही. तसेच त्यांना लेखी परिक्षेकरिता पुन्हा संधी देण्यात येणार नाही. लेखी परीक्षकसाठी महाआयटीकडून प्रवेशपत्र निर्गमित करण्यात आलेले policerecruitment2022.mahait.org या संकेतस्थळावरून डाउनलोड करून घ्यावे. उमेदवारांनी कोणत्याही प्रकारच्या भुलथापांना व आमिषाला बळी पडू नये. गैरप्रकार करताना कोणी आढळून असल्यास नियंत्रण कक्ष, सातारा यांचे 02162-233833 या क्रमांकावर संपर्क साधावा.
लेखी परिक्षा सुरु झाल्यानंतर ते परिक्षा कालावधी संपेपर्यंत कोणत्याही उमेदवारांस कोणत्याही कारणासाठी परिक्षा केंद्राबाहेर जाण्याची परवानगी दिली जाणार नाही. इतर जिल्ह्यातून तसेच सातारा जिल्ह्यातील दुर्गम भागातून येणाचा उमेदवारांची राहण्याची व्यवस्था छत्रपती शाहू क्रीडा संकूल, एस.टी. स्टॅन्ड शेजारी, सातारा या ठिकाणी करण्यात आलेली आहे. राहणेबाबत काही अडचणी आल्यास सहाय्यक पोलीस निरीक्षक, विठ्ठल शेलार गोबाईल क्र. 9923666064 यांचेशी संपर्क साधावा.
उमेदवारांकडे लेखी परिक्षेस येताना ‘ही’ कागदपत्रे आवश्यक
1. आवेदन अर्जाची प्रत
2. हॉल तिकीट प्रत
3. ओळखपत्राचा पुरावा म्हणून मुळ आधार कार्ड, ड्रायव्हींग लायसन्स, मतदानओळखपत्र) यापैकी एक ओळखपत्र आवश्यक आहे.
4. दोन पासपोर्ट साईज फोटो