हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कामी केले जाते. सध्या सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांची ऑनलाईन बदली प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या प्रक्रियेत एकूण 6 सवर्गामधील तब्बल 1 हजार 288 शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
गेल्या तीन महिन्यापासून जिल्हांतर्गत व जिल्ह्याबाहेरील शिक्षकांची ऑनलाईन बदली प्रक्रिया सुरु आहे. संवर्ग एक, दोन, तीन व चार, विस्थापित राऊंड व अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लॉगिनवरुन बदली आदेश प्रसिध्द करण्यात आले आहेत.
यापूर्वी विविध संवर्गातील शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या करण्यात आलेल्या आहेत. पती-पत्नी एकत्रीकरण, पती-पत्नी दोघेही जिल्हा परिषद कर्मचारी असतील तर दोघांपैकी एक जिल्हा परिषद व दुसरा राज्य शासनाचा कर्मचारी असेल तर, एक जिल्हा परिषद व दुसरा केंद्र शासनाचा कर्मचारी असेल तर त्यांना संवर्ग दोनमध्ये प्राधान्य देण्यात आले होते. त्यानुसार बदली प्रक्रिया पार पडत असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांनी दिली.