कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
कोल्हापूरचे काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी आमच ठरलय, आता दक्षिण उरलय अशी नवी घोषणा केली आहे. यामुळं कोल्हापूर दक्षिणेतील वातावरण गुरुवारपासून ढवळून निघालं आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या अमल महाडिक यांच्याकडून झालेल्या पराभवानंतर सतेज पाटील आणि महाडिक कुटुंबीयांमध्ये मोठा राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. त्यानंतर झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत अमल यांचे वडील, माजी आमदार महादेवराव महाडिक यांना पराभवाची धूळ चारत सतेज पाटील यांनी या पराभवाची परतफेड केली.
पुढं २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिक हे आघाडीकडून उमेदवार असतानाही त्यांना मदत न करता ‘आमचं ठरलंय’ म्हणत सतेज पाटील यांनी विरोधाची उघड भूमिका घेत महाडिक कुटुंबियांना आणखी जबर धक्का दिला. त्याचा योग्य परिणाम झाल्यानंतर राज्यभर ‘आमचं ठरलंय’ पॅटर्नची जोरदार चर्चा झाली. यंदाच्या निवडणुकीत पुतण्या ऋतुराजसाठी सतेज पाटील यांनी कंबर कसली असून कोल्हापूर दक्षिणसाठी ‘आमचं ठरलय,आता फक्त दक्षिण उरलय’ म्हणत अमल महाडिक यांना आव्हान दिलं आहे. या आव्हानांची जोरदार चर्चा जिल्ह्यात सुरू असून सतेज पाटलांच्या या रणनीतीला महाडिक गट आता कसं प्रत्युत्तर देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं.