हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक लोकांना बाहेरचे पदार्थ खाण्याची आवड असते. अशी लोकं सतत काही ना काही कारण काढून बाहेर जेवणाचा बेत आखत असतात. मात्र कोरोनामुळे स्वच्छतेच्या कारणांमुळे अनेक लोकं बाहेरचे अन्न खाण्यात कचरतात. अशातच लॉकडाऊन उघडल्यानंतर खाद्य विक्रेते तसेच हॉटेल्स आणि रेस्टोरंन्टसना स्वच्छतेची जास्त काळजी घेण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. दरम्यान, सौदी अरेबियातुन एक अशी बातमी समोर आली आहे, जी वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल. गेल्या तीस वर्षांपासून येथील एका रेस्टॉरंटमध्ये लोकांना टॉयलेटमध्ये बनवलेले समोसे दिले जात होते. आणि सर्वांत आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा समोसा खाण्यासाठी लोकं फार लांबून येत असत.
सौदी अरेबियातील जेद्दाहमधील एक रेस्टॉरंट नुकतेच स्वच्छतेची योग्य काळजी न घेतल्यामुळे बंद करण्यात आले आहे. या रेस्टॉरंटमध्ये गेल्या तीस वर्षांपासून लोकांना टॉयलेटमध्ये बनवलेले जेवण दिले जात असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे त्या शहरात एकाच खळबळ उडाली असून यामुळे नागरिकांमध्येही उलटसुलट चर्चा सुरु आहेत. हि बातमी आम्ही यासाठी देत आहोत कारण भारतात तसेच महाराष्ट्रातही अशाप्रकारे अस्वच्छ हॉटेल्स अस्तित्वात आहेत. आपण बाहेर जेवायला जाताना तेथील स्वच्छतेची खातरजमा हि करायलाच हवी. अनेकदा सदर हॉटेल लोकप्रिय आहे म्हणून आपण तेथील अस्वच्छतेकडे दुर्लक्ष करतो. मात्र हे आरोग्यासाठी चांगले नाही.
गल्फ न्यूजच्या एका वृत्तानुसार, या रेस्टॉरंटच्या खराब जेवणाविषयीची तक्रार जेद्दाह नगरपालिकेकडे करण्यात आली. यानंतर तपासणी केल्यानंतर अधिकाऱ्यांना आढळले की, या रेस्टॉरंटमध्ये फक्त खराब झालेलेच जेवण दिले जात आहे. अधिक तपास केला असता त्यांना असे आढळले की, त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या काही खाद्यपदार्थांची मुदत ही दोन वर्षांपूर्वीच संपलेली होती. मात्र या नंतरही हे पदार्थ लोकांना खाऊ घालण्यात येत होते. नगरपालिकेकडे आलेल्या तक्रारींनंतर जेव्हा या रेस्टॉरंटवर छापा टाकला गेला तेव्हा सर्वांना धक्काच बसला. कारण त्यांना आतमध्ये किडे आणि उंदीरही आढळून आले.
या रेस्टॉरंटमध्ये अशा मजुरांकडून जेवण बनवून घेतले जात होते ज्यांच्याकडे राहण्याची सोय नसल्याकारणाने कोणतेही काम मिळत नव्हते. या तपासात हे देखील उघड झाले आहे की त्यांच्याकडे कोणतेही हेल्थ कार्ड देखील नव्हते. सौदी अरेबियाच्या कडक नियमांदरम्यान अस्वच्छतेमुळे रेस्टॉरंट बंद होण्याची ही पहिलीच वेळ होती. याआधी देखील जानेवारी महिन्यात एका मट्णाच्या दुकानात उंदीर मांस खातानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता या रेस्टॉरंटच्या मालकाला काय शिक्षा होणार हे अद्याप कळलेले नाही. मात्र हे रेस्टॉरंट कायमचे बंद झाल्याचे स्पष्ट झाले आहे.