मृत्यूवेळी बापाचा टाहो मुलाला वाचवा : अपघातातील पिता- पुत्रावर एकाच सरणावर अंत्यविधी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

म्हसवड | माण तालुक्यातील नरबटवाडी (ढाकणी) येथील पिता- पुत्राला भरधाव बोलेरो चारचाकी गाडीने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. अपघातात वडिलांसोबत दुचाकीवरून निघालेला 13 वर्षाचा मुलगा ठार झाले आहे. ढाकणी फाट्यावर ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली. या घटनेची फिर्याद म्हसवड पोलिस ठाण्यात  मयत पोपट तातोबा नरबट याचा चुलत भाऊ सुरेश मारुती नरबट (वय- 38, रा. नरबटवाडी, ता. माण) यांनी दिली.

याबाबतीत अधिक माहिती अशी, पोपट तातोबा नरबट (वय- 52) व त्यांचा मुलगा विश्वास पोपट नरबट (वय- 13, दोघे रा. नरबटवाडी, ता. माण) हे मंगळवारी सायंकाळी दुचाकीवरून म्हसवड-मायणी रस्त्याने म्हसवड कडून मायणीच्या दिशेने निघाले होते. ढाकणी फाटा येथे उसाने भरलेली ट्रॉली रस्त्याच्या कडेला उभी होती. यास ट्रॅक्टर जोडलेला नव्हता. रस्त्यावर उभ्या असलेल्या या ट्रॉलीला दुचाकी पास करत असताना समोरुन येणा-या पांढ-या रंगाचे बोलेरो गाडीवरील चालकाने जोराची धडक दिली. धडकेनंतर बोलेरो गाडी न थांबता निघुन गेली. या धडकेमध्ये दुचाकीवरील विश्वास पोपट नरबट यास जोराचा मार बसल्याने तो जागीच ठार झाला. तर त्याचे वडील पोपट तातोबा नरबट हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना पुढील उपचारासाठी अकलूज येथे नेत असताना त्यांचे रस्त्यातच निधन झाले.

फिर्यादीने ट्रॅक्टर मालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हयगयीने व हलगर्जीपणाने ट्रॉली रस्त्यावर उभी केल्याने तसेच पांढ-या रंगाची बोलेरो गाडीवरील चालक यांनी धडक दिल्याने मुलगा व वडील यांचे मृत्यूस कारणीभूत असल्याचे नमूद करून त्यांचे विरोधात तक्रार दिली आहे.

मंगळवारी (दि.1) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ढाकणी येथे मुलगा विश्वास यास वह्या आणण्यासाठी गेले असता, काळाने त्यांच्यावर झडप घातली. अपघातानंतर मुलगा निपचित पडून आहे. हे लक्षात येताच मुलासाठी वडिल गंभीर जखमी असतानाही अरे कुणीतरी माझ्या मुलाला वाचवा असा टाहो फोडत होते. यावेळी उपस्थितांचे काळीज पिळवटून जात होते. याप्रसंगी ढाकणी येथील धिरज सरतापे यांनी प्राथमिक मदत मिळावी म्हणून खुप प्रयत्न केले. शेवटी पोपटराव नरबट यांच्या वर काळाने घाला घातल्याने दोघाही पिता पुत्रावर नरबटवाडी येथे एकाच सरणावर शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आला असून, या घटनेने ढाकणी नरबटवाडी सह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.