हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील सत्तासंघर्ष सुप्रीम कोर्टाच्या दारात असून उद्या होणारी सुनावणी सर्वोच्च न्यायालायने ३ ऑगस्टला ढकलली आहे. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयासह इतर सर्व याचिकांवर सरन्यायाधीश रमणा यांच्या त्रिसदस्यीय पीठासमोर ही सुनावणी होणार आहे.
यापूर्वी झालेल्या सुनावणी वेळी उद्धव ठाकरे गटाच्या वतीने वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला तर दुसरीकडे शिंदे गटाच्या वतीने वकील हरीश साळवे यांनी युक्तिवाद केला. त्यावेळी कोर्टाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर परिस्थिती जैसे थे ठेवत ही सुनावणी १ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली होती. तसेच दोन्ही बाजूंना शपथपत्र दाखल करण्यास सांगितले होते. यानंतर दोन्ही बाजूंनी कोर्टात शपथपत्र दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, शिंदे गटाच्या बंडखोरी मुळे शिवसेनेला मोठं खिंडार पडलं आहे. तसेच आमचा गट हीच खरी शिवसेना असा दावा बंडखोर गटाने केल्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणावर सर्वोच्च न्यायालय नेमका काय निर्णय देणार?? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष्य लागलं आहे.