मोठी बातमी! पश्चिम महाराष्ट्राच्या ‘या’ जिल्ह्यातील शाळा अनिश्चित काळासाठी बंद

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे

जिल्ह्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढत चालला असल्याने त्याला प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यातील इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यंतच्या सर्व शाळा 10 जानेवारीपासून ते पुढील आदेशांपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले.

परंतू ऑनलाईन पद्धतीने वर्ग सुरु राहतील. त्याबाबतची अंमलबजावणी करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेत तातडीने शिक्षण विभागाला लेखी आदेश काढण्यात आले. नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहिम सुरु करण्यात आल्याने त्या सुरुच राहतील असे पाटील यांनी सांगितले.

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतरही राज्यातील सर्व जिल्ह्यात शाळा बंद होत्या. सांगली जिल्ह्यातील पालकांनी कोरोना कमी होताच शाळा सुरु करण्यासाठी शाळांना सहमती दिली होती. त्यामुळे जिल्ह्यातील 2 हजार 977 शाळा जुलै महिन्यांपासून जिल्ह्यातील शाळा सुरु करण्यात आल्या होत्या. शाळा सुरु करण्यात सांगली जिल्हा आघाडीवर होता. मात्र कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेवून अवघ्या चार महिन्यात पुन्हा शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्याच्या विविध भागात कोरोनाने जोरदार संक्रमण केले आहेत, त्याबाबत उपाययोजना केल्या जात आहेत. शाळांमध्ये कोरोनाचा प्रसार होणार नाही, याबाबतची गंभीर दखल घेत जिल्ह्यातील इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यंतच्या सर्व शाळा दि. 10 जानेवारीपासून ते पुढील आदेशांपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश पालकमंत्री पाटील यांनी दिले आहेत.