हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर अनेक नेत्यांच्या राजकीय भेटीगाठी वाढल्या आहेत. त्यातच दोन दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यात तब्बल दोन तास चर्चा झाल्याचं कळतंय. या बैठकीला स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा फोनवरुन उपलब्ध होते. अमित शहा यांच्यात 20 मिनिटे चर्चा झाली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
विशेष म्हणजे या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रात आले आणि त्यानंतर महाराष्ट्रातील भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीला मोजके आणि महत्त्वाचे भाजप नेते उपस्थित होते. त्यामुळे महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’ने गती घेतलीय का असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.
दरम्यान, महाराष्ट्राच्या राजकारणात गुप्त बैठकी सुरु असल्याचं दिसतंय. कारण शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या गुप्त बैठकीची चर्चा सुरु असताना आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यातही गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे.