नवी दिल्ली । बाजार नियामक सेबीने देशातील दोन प्रमुख स्टॉक एक्सचेंज BSE (बॉम्बे स्टॉक एक्सचेंज) आणि NSE (नॅशनल स्टॉक एक्स्चेंज) यांना निष्काळजीपणासाठी दंड ठोठावला आहे. Karvy Stock Broking Ltd घोटाळ्याप्रकरणी दोघांना दंड ठोठावण्यात आला आहे.
सेबीने मंगळवारी रात्री यासंदर्भात आदेश जारी केला आहे. आपल्या आदेशात सेबीने म्हटले आहे की, कार्वी स्टॉक ब्रोकिंगद्वारे ग्राहकांच्या सिक्युरिटीजचा गैरवापर रोखण्यासाठी BSE आणि NSE ने वेळेवर पावले उचलली नाहीत. तसेच या प्रकरणाच्या तपासात सुस्तपणा दिसून आला. या कारणास्तव सेबीने दंड ठोठावला आहे.
किती दंड ठोठावला ?
सेबीने आपल्या आदेशात BSE ला 3 कोटी रुपये आणि NSE ला 2 कोटी रुपयांचा दंड ठोठावल्याची माहिती दिली आहे. ब्रोकरेज फर्म कार्वी स्टॉक ब्रोकिंगवर 2,000 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. हा देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा इक्विटी ब्रोकर घोटाळा आहे.
घोटाळा कसा झाला?
सेबीच्या म्हणण्यानुसार, कार्वी स्टॉक ब्रोकिंगने त्यांच्या ग्राहकांच्या खात्यात असलेले शेअर्स विकले आणि रु. 1,096 कोटी त्यांच्या इतर ग्रुप कंपनी, कार्वी रियल्टीला ट्रान्सफर केले. शेअर्सची ही विक्री एप्रिल 2016 ते डिसेंबर 2019 दरम्यान करण्यात आली. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर सेबीने त्याची चौकशी केली. ब्रोकरेज कंपनीने ग्राहकांच्या सिक्युरिटीजचा गैरवापर केल्याचे सेबीने तपासाच्या सुरुवातीला म्हटले होते. ग्राहकांनी त्यांच्या माहितीशिवाय त्यांच्या सिक्युरिटीजचा वापर इतर कारणांसाठी केला आणि त्यांना परवानगी नसलेल्या ट्रेडिंग मध्ये गुंतवले.
हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर, सेबीने कार्वी स्टॉक ब्रोकिंगला तात्काळ प्रभावाने नवीन ग्राहक जोडण्यापासून रोखले.