हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “मी शरद पवारांनी वसंतदादाच्या पाठीत खंजीर खुपसला असे म्हंटले होते. मात्र, त्यावेळी वेगळी परिस्थिती होती आणि आता वेगळी आहे. वसंतदादांच्या वेळी जे घडलं आणि हे बाहेर पडले तेव्हा स्वतःच्या कुवतीने पुन्हा उभं राहण्याची त्यांची ताकद होती. मात्र, आपल्या काकाला सोडून सत्तेत गेलेल्या व उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेल्या अजित पवार यांनी चूकच केली आहे. जो व्यक्ती सख्या काकांना सोडून रात्रीच्या अंधारात शपथ घ्यायला जातो. तो उद्या भाजपचा विश्वासघात कशावरून करणार नाहीत?” असा सवाल करत स्व. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी, माजी मंत्री शालिनीताई पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते अजित पवार यांनी बंडखोरी करत भाजप-शिंदे सरकारसोबत जात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या घटनेनंतर माजी मंत्री शालिनीताई पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी थेट अजित पवारांवर निशाणा साधला आहे. माजी मंत्री पाटील यांनी आज एक वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपण शरद पवार यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे सांगत आपली भूमिका स्पष्ट केली.
यावेळी त्या म्हणाल्या की, अजित पवार आज भाजपमध्ये गेले आहेत. त्याचे खरे कारण सांगायचे झाले तर जो काही अपराध त्यांनी केला आहे तो लपवण्यासाठी ते भाजपसोबत गेले आहेत. अजित पवारांनी अनेक घोटाळे केले आहेत. त्यांनी जरंडेश्वर साखर कारखान्यामध्ये सुद्धा घोटाळा केलेला आहे.
अजित पवारांच्या घोटाळ्याची यादी घेऊन निवडणुकीत उतरणार : शालिनीताई पाटील
अजित पवारांनी जे जे काही साखर कारखान्याचे घोटाळे केलेले आहेत त्या घोटाळ्यांची यादी माझ्याकडे आहे. ती यादी मी घेणार असून ती 20 लाख मतदारांपर्यंत पोहोचवणार आहे. माझं वय जरी 90 असेल तरी देखील मी अजित पवारांच्या विरोधात येत्या निवडणुकांमध्ये प्रचारासाठी उतरणार आहे, असे शालिनीताई पाटील यांनी म्हंटले.
2 वर्ष जेलमध्ये कशासाठी गेलात? : शालिनीताईंचा भुजबळांना टोला
“शरद पवारांनी वसंतदादांना सोडलं आणि त्यांना त्रास झाला. ती परिस्थिती आणि ही आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. वसंतदादांच्या वेळी जे घडलं आणि हे बाहेर पडले तेव्हा स्वतःच्या कुवतीने पुन्हा उभं राहण्याची त्यांची ताकद होती. तुम्ही स्वतःत्या कुवतीने उभे राहु शकता का? भुजबळांना विचारतील की नाही तुम्ही कोण आहात आणि काय केलत? दोन वर्ष जेलमध्ये कशासाठी गेलात?” असा टोला शालिनीताई पाटील यांनी भुजबळांना लगावला.