विरोधकांना मानसिक त्रास देण्याचं काम भाजपकडून सुरू; शंभूराज देसाईंचा गंभीर आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मुंबई व अलिबाग येथील संपत्तीवर ईडीने आज कारवाई करीत ती जप्त केली. याबाबत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी भाजप व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील याच्यावर निशाणा साधला आहे. “केंद्राच्या विरोधातील पक्षाच्या नेत्यांना नाहक त्रास देण्याचं काम भाजपकडून सुरू आहे. चंद्रकांत पाटील ईडीचे प्रवक्ते आहेत का? त्यांच्याकडून काहीही बोलून नाहक पुड्या सोडून लोकांच्यात संभ्रम निर्माण करण्याचे काम सुरू आहे, अशी टीका मंत्री देसाई यांनी केली.

मंत्री देसाई यांनी सातारा येथे आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, केंद्रात असलेल्या सरकारच्या विरोधात जे पक्ष आहेत. त्या पक्षातील नेत्यांना जाणीवपूर्वक अडचणीत आणण्याचे काम गेली दीड वर्ष महाराष्ट्रामध्ये ईडीकडून सुरू आहे. जूनं प्रकरण उकरून काढून नाहक मानसिक त्रास देण्याचं काम सुरू आहे.

मंत्री देसाई यांनी यावेळी चंद्रकांत पाटील यांच्यावरही निशाणा साधला. यावेळी देसाई म्हणाले की, चंद्रकांत पाटील ईडीच प्रवक्ते आहेत का? त्यांना कसं कळतं की 8 दिवसांनी ईडी कोणाचं नाव घेणार आहे. त्यामुळे यात शंका घेण्याला वाव आहे. आम्ही धाडसाने आणि धैर्याने या संकटाला सामोरे जाऊ. शिवसेना घाबरणारी नाही. सरकार पडणार असं भाजपवाले पुड्या सोडायच काम करतात त्यांना कुठलंही काम नाही. इंचभर हे सरकार हलले नाही. नाहक पुड्या सोडून लोकांच्यात संभ्रम निर्माण करण्याचे काम भाजपकडून सुरू आहे. शिवसेनेच्या नेत्यांचा मानसिक छळ करण्यासाठी अश्या प्रकारच्या कारवाया उकरून काढल्या जात असल्याचा आरोप यावेळी मंत्री देसाई यांनी केला.