हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा उभारण्यासाठी भीक मागितली असं वादग्रस्त वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर केल्यांनतर पुण्यात त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती. याप्रकरणानंतर राज्यात राजकीय वातावरण तापलं असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार याची यावरून चंद्रकांत पाटलांचे कान टोचले आहेत. शाईफेकीचे समर्थन आम्ही करतच नाही, परंतु चंद्रकांत पाटलांनी भीक हा शब्द टाळायला हवा होता असे पवार म्हणाले.
शरद पवार यांचा आज ८२ वा वाढदिवस असून यानिमित्ताने आयोजित एका कार्यक्रमामध्ये उपस्थितांना संबोधित करताना शरद पवार म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई टाकली त्याचे समर्थन करणार नाही. परंतु महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत बोलत असताना त्यांनी जे शब्द वापरले ते वापरायला नको होते. कर्मवीर भाऊराव पाटलांनी आयुष्यभर जनसेवा केली. बायकोचे दागिने विकले. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या संस्थेचं ब्रिद आहे कमवा आणि शिका, भिक मागा असं नाही. त्यामुळे भीक हा शब्द कोणाला आवडणार नाही.
त्यानंतर त्यांनी हद्दच केली. गिरणी कामगारांचा मुलगा आहे म्हणून आपल्याविरोधात हे केलं गेलं असा कांगावा केला. पण तुम्ही आधी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री होता. प्रदेशाध्यक्ष होता. आताही मंत्री आहात. एखाद्या सामान्य कुटुुंबामधील व्यक्ती ही सत्तेच्या शिखरावर जाते ही काही केवळ तुमच्या बाबतील घडलेली नाही. त्यांच्यावर टीकाटिप्पणीही झाली. मात्र त्यांनी असा कांगावा केला नाही असं म्हणत पवारांनी चंद्रकांत पाटलांचा संचार घेतला.