फोटो ट्विट : दिल्लीत शरद पवार आणि छ. उदयनराजे भोसले यांची भेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी बुधवारी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. उदयनराजे यांनीच या भेटीचा फोटो ट्विट केला आहे. तसेच ही सदिच्छा भेट असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. शरद पवार आणि छ. खा. उदयनराजे भोसले यांच्यात जवळपास अर्धा तास झालेली आहे. या भेटीनं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनानिमित्त शरद पवार यांच्यासह उदयनराजे व अन्य खासदार दिल्लीत मुक्कामी आहेत. उदयनराजे बुधवारी सकाळी गुलाबाच्या फुलांचा गुच्छ घेऊन शरद पवार यांच्या घरी दाखल झाले. यावेळी दोघांमध्ये काहीकाळ चर्चाही झाली. पवारांचा नुकताच वाढदिवस झाला आहे. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी ही भेट असल्याचे सांगितले जात आहे. पण या भेटीतून आगामी काळात सातारा जिल्ह्यात वेगळी राजकीय समीकरणे तर उदयास येणार नाहीत ना, याचीच चर्चा रंगली आहे.

https://www.facebook.com/Chh.UdayanrajeBhonsleOfficial/photos/a.299268716878978/2238112316327932/

उदयनराजेंनी राष्ट्रवादी सोडली असली तरी शरद पवार यांच्यावर असलेले प्रेम व जवळीक संपलेली नाही. मध्यंतरी शरद पवार आजारी असताना त्यांनी पुण्यात त्यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली होती. त्यामुळे शरद पवार आणि उदयनराजे यांचे वेगळे नाते निर्माण झाले आहे. पुढील काळात सातारा पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होत असल्याने आजची भेट महत्वाची मानली जात आहे.

काही दिवसांपूर्वी भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी फलटणमधील कार्यक्रमात सातारचा खासदार निंबाळकर यांच्या सारखा असावा असे वक्तव्य केले होते. यावरून उदयनराजे यांच्याविषयी भाजपमध्ये नाराजी असल्याचे चित्र तयार झाले होते. पण खासदार निंबाळकर यांनी मी माढा मतदारसंघातूनच लढणार असून साताऱ्यातून उदयनराजे हेच खासदारकी साठी योग्य आहेत, असे सांगत सारवासारव केली. तर उदयनराजे यांनीही गांभीर्याने घेतले नाही. पण त्यांनी यावर प्रतिक्रिया देणे टाळले होते.

Leave a Comment