हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी इथं रविवारी शेतकऱ्यांसह 8 जणांना चिरडल्यानंतर देशभरात संतापाचा उद्रेक आहे. कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून चिरडण्यात आले. यानंतर देशभरातील विरोधी पक्ष आक्रमक झाला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या घटनेसाठी भाजपला जबाबदार धरत तीव्र निषेध केला आहे.
शेतकऱ्यांनी शांततेत आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी काही लोकांनी विशेषत, भाजप सरकारांमध्ये सत्तेत सहभागी असणाऱ्या लोकांच्या कुटुंबीयांनी शेतकऱ्यांवर गाडी चालवून दूर करण्याचा प्रयत्न केला. यामुळे काही शेतकऱ्यांची हत्या झाली. या घटनेला दिल्लीतील केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेशातील भाजप सरकारची जबाबदारी आहे, असं शरद पवार म्हणाले.
शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरु आहे, पण भाजपला यात यश मिळणार नाही. देशातला शेतकरी याच केंद्राला उत्तर देईल. हे नेमकं कोणत्या पद्धतीचं राज्य आहे? विरोधी पक्षाच्या नेत्यांची अडवणूक करता, त्यांना कोंडून ठेवलं जातंय हे योग्य नाही. देशाचा शेतकरी वर्ग एकटा नाही. संपूर्ण देश बळीराजाच्या पाठिशी उभा आहे, असं शरद पवार म्हणाले.