हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राष्ट्रवादीत फूट पडल्यापासून अजित पवार गट आणि शरद पवार गट एकमेकांवर टीकांचा वर्षाव करताना दिसत आहेत. यात अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यामध्ये देखील टीकाटिपणी होत असलेली पाहायला मिळत आहे. कारण की, गेल्या दोन दिवसांपूर्वीच “शरद पवार पक्षात स्वत: निर्णय घेतात पण बाहेर आल्यानंतर पक्षाचा निर्णय सर्वानुमते असल्याचे सांगतात” अशा टीका अजित पवार यांनी शरद पवारांवर केली होती. आता त्यांच्या याच टीकेला शरद पवार यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
सातारामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना, “अजित पवारांनी त्यांचा पक्ष चालवावा, दुसर्याच्या पक्षात नाक खुपसू नये” असे प्रत्युत्तर शरद पवार यांनी अजित पवार यांच्या टीकेवर दिले आहे. तसेच, “मागील निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर विरोधी पक्षांना मिळून लोकसभेच्या 6 जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत इंडिया आघाडीचे 30 ते 35 खासदार महाराष्ट्रातून निवडून येतील, याची खात्री आहे. इंडिया आघाडीला महाराष्ट्रातील लोकांचे समर्थन मिळत आहे. हे पाहून मोदींचा आत्मविश्वास निघून गेला आहे.” असा टोलाही पवारांनी मोदींना लगावला आहे.
इतकेच नव्हे तर, “भाजपची ज्या राज्यात सत्ता आहे, तिथे त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिंग बूथच ताब्यात घेण्याचा प्रकार केला, याबाबत निवडणूक आयोगानेच लक्ष घालावे” अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे. तसेच, मतदानाच्या वेळी पैसे वाटल्याच्या प्रकारावर बोलताना शरद पवार म्हणाले की, “लोकसभा निवडणुकीत पैसे वाटले जात होते, याचे फोटो, व्हिडीओ फिरत होते. माझ्या आतापर्यंतच्या राजकारणात पैसे वाटून मते विकत घेण्याचा प्रकार कधी केला नाही. आता एक नवीन संस्कृती महाराष्ट्राच्या राजकारणात रुजू पाहतेय, हे धोकादायक आहे”