Tuesday, June 6, 2023

नॉनव्हेज खाल्ल्याने मंदिरात जाणे माझ्या बुद्धीला पटत नाही; पवारांनी बाहेरुनच घेतले दगडूशेठ गणपतीचे दर्शन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दुपारी तीन वाजता पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले. मात्र, त्यांनी गणपतीच्या मंदिरात न जाता बाहेरूनच गणपतीला दोन्ही हात जोडून गणपतीला प्रणाम केला. यामागचे कारण म्हणजे त्यांनी आज नॉनव्हेज खाल्ले असल्याने त्यांनी मंदिरात जाणे टाळले. पवार यांच्या या प्रकाराची चर्चा मात्र सोशल मीडियावर चांगलीच होऊ लागली आहे.

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराच्या शेजारी असणारी गृह विभागाची जागा दगडूशेठ ट्रस्टला देण्याचे अनेक दिवसांची मागणी होती. त्यासाठी शरद पवार भिडे वाडा आणि दगडूशेटचा पाहणीसाठी आले होते. यावेळी ते दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनासाठी जाणार होते. मात्र, त्यांनी मंदिराच्या आत न जाता बाहेरूनच गणपतीला हात जोडत दर्शन घेतले.

यावेळी त्या ठिकाणी असलेल्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पवार यांना मंदिरात का नाही जात असे विचारले असता पवार यांनी मी आज ‘मी आज नॉनव्हेज खाल्ले आहे. त्यामुळे मंदिरात जाणे माझ्या बुद्धीला पटत नाही’, असे म्हंटले असल्याचे जगताप यांनी सांगितले.

संपूर्ण महाराष्ट्र्भर फिरणारे शरद पवार हे नास्तिक आहेत. ते देव मानतच नाहीत तसेच त्यांचा एकही फोटो देवळात हात जोडतानाचा सापडणार नाही, असे गंभीर आरोप राज ठाकरे यांनी पवार यांच्यावर केले होते. त्यामुळे आज शरद पवार हे पुण्यातील दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊन राज ठाकरे यांच्या टीकेला पकाय बोलून प्रत्युत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, पवारांनी नॉनव्हेज खाल्याने त्यांनी मंदिरात न जाता बाहेरूनच दर्शन घेतले. आता पवार यांच्या या कृतीमुळे त्यांच्यावर मनसेकडून काय निशाणा साधला जाणार हे पहावे लागेल.