हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा राजीनामा पक्षाच्या निवड समितीने फेटाळून लावला असून शरद पवार यांनीच पक्षाचे अध्यक्ष रहावं असा नवीन प्रस्ताव मंजूर करून घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी हा प्रस्ताव शरद पवार यांच्या कडे पाठवला असून यानंतर मला विचार करायला थोडा वेळ द्या असे उत्तर शरद पवार यांनी दिल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.
आज मुंबई येथील राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात निवड समितीतील नेत्यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत पवारांचा राजीनामा फेटाळण्यात आला असून शरद पवार यांनीच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष राहावे यापध्दतीचा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. हा प्रस्ताव घेऊन राष्ट्रवादीचे बडे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत सिल्व्हर ओक वर गेले.त्यांनी समितीच्या निर्णयाची माहिती शरद पवार यांना दिली. तुम्ही आमच्या निर्णयाचा आदर राखावा, अशी विनंती त्यांनी पवारांना केली. यानंतर पवार यांनी मला विचार करण्यास थोडा वेळ द्या, असं उत्तर दिले. त्यामुळे पवार नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी मुंबईतील कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी एका कार्यकर्त्याने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न सुद्धा केला होता. मात्र त्यानंतर निवड समितीने पवारांचा राजीनामा फेटाळून लावल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केल्याचं पाहायला मिळाले.