हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या वतीने राज्यभर राज्यपालांविरोधात आंदोलन केली जात आहेत. राज्यपालांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली असून “राज्यपालांच्या डोक्यावरच्या टोपीचा रंग आणि त्यांच्या अंतःकरणाचा रंग याच्यात काही फारसा फरक नाही. दोन्हींचा रंग एकच आहे,” अशी टीका पवारांनी केली आहे.
शरद पवार यांनी आज नाशिक दौऱ्यावेळी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, या राज्यपालांच्या बद्दल काय बोलण्यासारखं उरलेच नाही. यांच्याबद्दल काय बोलायचं हे सांगणं कठीण झालं आहे. याच्या आधी यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल असेच एक भयानक विधान केले होते. सावित्रीबाई फुले यांच्या बद्दलही ते बोलले होते. आता एक त्यांचं एक वेगळ्या पद्धतीचं वक्तव्य आलेलं आहे.
महाराष्ट्र हे सर्व जातीच्या धर्माच्या लोकांना घेऊन जाणारे राज्य आहे. असे असताना तिथं जी काही मुंबईची प्रगती झाली ती सर्व सामान्य माणसाच्या कष्टातून, घामातून झाली आहे. असे असताना अशा प्रकारची विधानं करणं हे काही शहाणपणाचे लक्षण नाही. यावरती आणखी जास्त बोलण्याची काही गरज नाही, असे पवारांनी म्हंटले आहे.
राज्यपाल नेमकं काय म्हणाले?
मुंबईतील एका कार्यक्रमात भाषणादरम्यान राज्यपाल कोश्यारी यांनी मुंबईबाबत वादग्रस्त विधान केले. ते म्हणाले, “कधी कधी मी इथल्या लोकांना बोलतो महाराष्ट्रात, मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी यांना बाहेर काढल्यानंतर मुंबई ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही. मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. मात्र मुंबईची ती ओळखही उरणार नाही, असेही कोश्यारींनी म्हंटले.