हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाविकासआघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तीन पक्ष एकत्र आल्यानंतर काही बाबतींत एकमेकांशी जुळवून घेणं या तिन्ही पक्षांना अवघड जात आहे. कधी काँग्रेसकडून शिवसेनेवर कुरघोडी केली जाते तर कधी शिवसेनेकडून काँग्रेसला चुचकारण्याचा प्रयत्न करण्यात येतो.
राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्या सत्तानाट्यात शांत वाटत असली तरी अजित पवार केव्हा काय भूमिका घेतील आणि चक्रे फिरतील हे सांगता येत नाही. महाविकासआघाडी टिकवण्याची जबाबदारी प्रत्येक पक्षातील एका जबाबदार व्यक्तीने हाती घ्यायचा विचार करुन शरद पवार, अहमद पटेल आणि उद्धव ठाकरे यांनी तिघांची एक कमिटी स्थापन केली आहे. याच कमिटीतील जबाबदार व्यक्ती म्हणून शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची आज एक बैठक घेतली.
या बैठकीमध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या लोकांसाठी चतुसुत्री सांगितली आहे. सामाजिक न्याय विभागात जोमाने काम करु, अल्पभूधारकांसाठी चांगल्या संधी उपलब्ध करुन देऊ, महिलांसाठी चांगल्या योजनांची अंमलबजावणी करुया आणि विविध संघटनांचं काम करणाऱ्या लोकांना बळ देऊया असा संदेश शरद पवारांनी दिला आहे. अल्पसंख्यांकांच्या मुद्द्यावर काम करण्यासाठी राष्ट्रवादीने विशेष सत्र आयोजित केलं होतं, त्यावेळी शरद पवारांनी आपली भूमिका मांडली. आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरूनही शरद पवारांनी हे ट्विट केलं आहे.