सातारा । राजकारणात संधी मिळत नसते तर ती हिसकावून घ्यावी लागते असं विधान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलंय. महाबळेश्वर येथे युवक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना पवार यांनी युवकांना राजकाराणात येण्याचं आवाहन केलंय. यावेळी बोलताना राजकारणात यशस्वी होण्यासाठी काय करायला हवं हेसुद्धा पवार यांनी सांगितलं.
संधी राजकारणात मिळत नसते तर ती हिसकावून घ्यावी लागते. तरुण मुलांनाही संधी मिळत नसते. तुम्हाला तुमची खुर्ची लक्ष ठेऊन ती घ्यावी लागेल. नाहीतर आम्ही उठत नसतो. त्या तयारीने राहण्याची गरज आहे असं म्हणत शरद पवारांनी तरुणांना राजकारणाचं बाळकडू पाजलं.
मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा चेहरा बदलायचा आहे – पवार
तरूणाना संबोधित करताना शरद पवार यांनी आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा चेहरा बदलायचा आहे असे विधान केले आहे. “मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा चेहरा बदलायचा आहे. चेहरा बदलायचा याचा अर्थ तरुणांना त्याठिकाणी आणायचं आह. मात्र हे करत असताना सर्व तरुणांनी थेट विधानविधानसभा डोळ्यांसमोर ठेऊ नका. जे काही हातात घेता येईल ते घ्या. कर्तृत्व दाखवण्याची संधी आहे. आयुष्यात नेतृत्व सिद्ध करण्याची संधी आहे. तरुणांनी हे करताना कमी पडू नये असं शरद पवार यावेळी म्हणालेत.