हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे जाणता राजाच आहेत. त्यात चूक काय? असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शरद पवारांना आपण जाणता राजा का म्हणतो याची कारणेही सांगितली. ते नाशिक येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
जानता राजा म्हणजे काय? तर लोकांचे प्रश्न समजून घेऊन जो हे प्रश्न सोडवतो. जनतेशी एकरूप होतो त्याला जानता राजा म्हणतात. शरद पवार हे राजकारणातून चार वेळा मुख्यमंत्री झाले. देशभरात इतर पदेही भूषविली. त्यांनी गोरगरिबांचे प्रश्न सोडवले. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले. पुणे, नाशिक, मुंबईमध्ये 80 टक्के ऑटोमाबाइल्सचे कारखाने पवार साहेबानी आणले. उद्योगधंदा वाढवला. मी त्याला साक्ष आहे असं भुजबळ म्हणाले.
शरद पवारांनी महिलांचे प्रश्न सोडवले. सत्ता गेली तरी बेहत्तर परंतु त्यांनी न घाबरता मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव दिलं. यालाच जाणता राजा म्हणतात. जो जनतेमध्ये एकरूप होऊन त्यांचे प्रश्न सोडवतो, त्याला जाणता राजा म्हणतात. त्यामुळे आम्ही शरद पवारांना जाणता राजा म्हणतो . तुम्हाला म्हणायचं असेल तर म्हणा किंवा नका म्हणू, असं भुजबळ म्हणाले.